esakal | राजेश क्षीरसागर याच्या या नंबरीची आहे कार्यकर्त्यांना भुरळ
sakal

बोलून बातमी शोधा

 This number of Rajesh Kshirsagar has fascinated the activists

शिवसैनिक राजेश क्षीरसागर दोनदा कोल्हापूर उत्तरचे आमदार झाले. शिवसेना स्टाईलने आंदोलन त्यांच्या रक्तात भिनलंय. कट्टर कार्यकर्त्यांची फौज त्यांचे बळकट बाहू आहेत. सडेतोड, परखड व आक्रमक शैलीत बोलणारा हा नेता. कोल्हापूरच्या रांगडेपणाचा अभिमान बाळगतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक ही कार्यकर्त्यांत त्यांची ओळख 

राजेश क्षीरसागर याच्या या नंबरीची आहे कार्यकर्त्यांना भुरळ

sakal_logo
By
संदीप खांडेकर

शिवसैनिक राजेश क्षीरसागर दोनदा कोल्हापूर उत्तरचे आमदार झाले. शिवसेना स्टाईलने आंदोलन त्यांच्या रक्तात भिनलंय. कट्टर कार्यकर्त्यांची फौज त्यांचे बळकट बाहू आहेत. सडेतोड, परखड व आक्रमक शैलीत बोलणारा हा नेता. कोल्हापूरच्या रांगडेपणाचा अभिमान बाळगतो. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक ही कार्यकर्त्यांत त्यांची ओळख 
आहे. गाडीच्या नंबरावरून त्यांची दुसरी ओळख आकाराला आली आहे. त्यांच्या गाडीचा एमएच-09 डीव्ही 9099 नंबर कार्यकर्त्यांच्या हृदयात ठसलाय. केवळ त्यांच्या गाडीचा नंबर पाहून "कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला,' अशी घोषणा कार्यकर्त्यांतून आल्या शिवाय राहत नाही. 


क्षीरसागर यांनी राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर स्वतःच्या आयडेंटिटीसाठी गाडीच्या नंबरवर फोकस केला. कोल्हापूरचा एमएच - 09 हा गाड्या पासिंगचा नंबर. या नंबरप्रमाणेच गाड्यांचा नंबर असावा, अशी त्यांची इच्छा झाली. गाड्यांसाठी 9099 क्रमांक त्यांच्या पसंतीला उतरला. राजकीय नेते, उद्योजक, डॉक्‍टर अथवा चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींचा गाड्यांचे नंबर वैशिष्ट्यपूर्ण असावेत, असा आग्रह असतो. तसाच तो क्षीरसागर यांचाही होता. आमदारकीच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी प्रचारासाठी पायाला भिंगरी बांधली. निवडणुकीतील विजयानंतर त्यांचा कोल्हापूर उत्तरमध्ये संपर्क दौऱ्याचा नारळ फुटला. गल्ली-बोळांतील कार्यकर्त्यांची भेटीगाठी नित्याच्या झाल्या. 9099 क्रमांकाची गाडी, त्यावर भगवा झेंडा दिसताच क्षीररसागर भागात आल्याची वर्दी भागात पसरू लागली. 
शिवसेना स्टाईलने बोलण्याची क्षीरसागर यांची लय कार्यकर्त्यांत प्रभावी ठरली. कट्टर कार्यकर्त्यांचे मोहोळ त्यांच्याभोवती एकवटले. साहेब म्हणतील ती पूर्व दिशा प्रमाण मानण्यात कार्यकर्ते पुढे राहू लागले. आंदोलन कोणतेही असो फडफडणारा भगवा झेंडा व 9099 गाडीभोवती कार्यकर्त्यांचा जथ्था दिसू लागला. कार्यकर्त्यांच्या गाड्यांच्या नंबरप्लेटवर क्षीरसागर यांच्या नंबराची छाप उमटली. मुलगा ऋतुराज व पुष्कराज यांच्या नजरेतही वडिलांच्या गाडीचा क्रमांक भरला. दोघांचा गाड्यांवर हाच क्रमांक आला. क्षीरसागर यांच्या वडिलांच्या चारचाकीवर याच क्रमांकाला पसंती मिळाली. आमदारकीच्या दुसऱ्या निवडणुकीत क्षीरसागर पुन्हा विजयी झाले. कार्यालयातील फोन नंबर असो की, कार्यकर्त्यांचे मोबाईल नंबर त्यामध्ये 9099 क्रमांकाला विशेष स्थान मिळाले. 
क्षीरसागर यांच्या मोबाईलच्या नंबरवर मात्र गाडीच्या क्रमाकांतील अंक आले नाहीत. हा नंबर अनेक कार्यकर्त्यांच्या डोक्‍यात बसल्याने तो बदलणे शक्‍य नसल्याचे कारण ते देतात. मनाला स्थिरता देणारा, विकासाला साथ देणारा व समाजाची भरभराट करणारा असल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांत आहे. 


"माझ्या गाडीचा क्रमांक माझ्यासाठी ब्रॅंड आहे. हा नंबर माझ्या कार्यकर्त्यांच्या आवडीचा आहे. राज्यात कोठेही गेलो तरी नंबर पाहून कार्यकर्ते गाडीभोवती गर्दी करतात." 
- राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

संपादन - यशवंत केसरकर

loading image
go to top