esakal | घराचं स्वप्न महागलं; 'क्रेडाई'च्या अभ्यासात आला नवा निष्कर्ष समोर!
sakal

बोलून बातमी शोधा

home loan

घराचं स्वप्न महागलं; 'क्रेडाई'च्या अभ्यासात नवा निष्कर्ष समोर!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

सांगली : कोरोना संकटात ‘लॉकडाउन-अनलॉक’चा सुरू असलेला खेळखंडोबा; डिझेल दरात अचानक झालेली वाढ आणि त्याचा एकूणच उद्योग, व्यापार, कामगारांवर झालेला परिणाम, याचे पडसाद बांधकाम क्षेत्रात खूप वेगाने उमटले आहेत. सळी, सिमेंटपासून ते वाळू, ग्रीड, लाकूड या साऱ्याच बांधकाम साहित्याच्या दरात सरासरी २५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली अहे. परिणामी बांधकामाचा प्रती चौरस फुटाचा खर्च सरासरी २०० ते २५० रुपयांनी वाढला आहे. त्यामुळे घराचे स्वप्नही चौरस फुटाला किमान २०० रुपयांनी महाग झाले आहे.

कोरोना संकट काळात गेल्या एक-दीड वर्षात बांधकाम क्षेत्राची गती ठप्प झाली होती. मोठ्या उलाढाली थांबल्या आहेत. संकट हलके होईल आणि पुन्हा उलाढाल वाढेल, या अपेक्षेला सतत दणके बसत होते. त्यात महागाई उच्चांकी पातळीवर पोहचली आहे. ही दरवाढ सातत्यपूर्ण राहील, या अंदाजावर स्वतःचे स्वतंत्र घर बांधू इच्छिणाऱ्यांनी काम हाती घेतले आहे. त्यातच नवे घर खरेदी करण्याकडेही नवा ग्राहक पुढे येतो आहे. त्यामुळे या क्षेत्रात उलाढाल दिसते आहे, मात्र त्यांच्या बजेटला दणका बसला आहे. आधी सिमेंट, सोबत सळीची दरवाढ झाली. त्यात डिझेलच्या दराने थेट शंभरीकडे कूच केल्यानंतर वाहतूकीच्या वाढीव खर्चाचा मोठा भार पडला. कोरोना संकटाच्या दुसऱ्या लाटेत बहुतांश लोह, सिमेंट प्रकल्प बंद होते. ते सुरू होऊन साहित्य बाजारात येईपर्यंत इकडे बांधकाम क्षेत्रात हालचाली गतिमान झाल्या होत्या. मागणी आणि पुरवठा याचा मेळ चुकला होता. साहजिकच, बाजार नियमानुसार दराने उसळी घेतली. पुन्हा त्यात काही टक्के कमी झाली, मात्र मूळ वाढ संपली नाही.

कोरोना लाटेच्या आधी सळीचा सरासरी दर ४० ते ४५ हजार रुपयांच्या घरात होता. तो ६० ते ६५ हजार रुपयांवर पोहचला. त्यात पुन्हा घसरण झाली आणि आता तो ५० ते ५५ हजाराच्या घरात स्थिरावला आहे. त्यावर १८ टक्के जीएसटी वेगळी आकारली जाते. सिमेंट दर सरासरी ३०० ते ३१५ रुपयांवरून आता ३५० ते ३६० रुपये झाले आहेत. प्लंबिंग साहित्याची वाढ ३० ते ४० टक्के आहे. लाकूड दरात वाढ झाली आहे. डिझेल दरवाढीचा परिणाम वीट, दगडावर झाला आहे. वाळू दरातील वाढ अदृश्‍य, सोयीनुसार आहे. सहाजिक या साऱ्यामुळे बांधकामाचा खर्च वाढला आहे.

मोठ्या घराकडे कल...

कोरोनोत्तर काळात घर खरेदीबाबतच्या क्रेडाईच्या अभ्यासात काही नवे निष्कर्ष समोर आले आहेत. गेल्या दीड वर्षात लोक घरीच थांबून होते. त्यांनी घरातील दोष शोधले, कमरता शोधल्या. त्यातून घराबाबत नव्या संकल्पना समोर आल्या. त्यातून नव्या आणि मोठ्या घराची मागणी पुढे आली. अन्य गुंतवणुका कमी करून घरात गुंतणूक करावी, असा विचारही लोक करत आहेत. त्यातूनच सुविधांनी युक्त घराबाबत विचार सुरु झाला आणि त्यादृष्टीने बाजारात मागणीही पुढे आली आहे. परिणामी, कोरोनाचे संकट थांबल्यानंतर बांधकाम क्षेत्राला बसलेली खीळ निघेल आणि मोठी गती प्राप्त होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. अर्थात, हे स्वप्न आता महाग झालेय, याची जाणीव लोकांनाही आहे.

मनपा क्षेत्रात १५० प्रकल्प

महापालिका क्षेत्रात सध्या सुमारे १५० गृहप्रकल्प सुरू आहेत. त्यात दोन हजाराहून अधिक फ्लॅटचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्र मंदीतून बाहेर पडत आहेत. पुढील काळ या क्षेत्रात गुंतवणूक वाढवणारा ठरेल, असा विश्‍वास बांधकाम व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

अपार्टंमेंट बांधकामाचा खर्च सरासरी प्रति चौरस फूट २०० ते २५० रुपयांनी वाढला आहे. परिणामी, फ्लॅटच्या किंमती २०० रुपयांची वाढ केलेलीच आहे. याआधी अंदाजे १४०० ते १५०० रुपये गृहित धरला होता. आता तो १६०० ते ७०० पर्यंत पोहचला आहे. खर्चात वाढ झाली असली तरी बांधकाम क्षेत्राची उलाढाल वाढली आहे. एक-दीड वर्षाच्या खंडानंतर बांधकाम क्षेत्राला पुन्हा चांगले दिवस येताना दिसताहेत.

- दीपक सूर्यवंशी, अध्यक्ष, क्रेडाई

प्रतिचौरस फुटास २०० रुपयांनी वाढ

पेट्रोल, डिझेल वाढीचा फटका

बांधकाम क्षेत्रापुढे आव्हान

सळी, वीट, सिमेंट, वाळू, ग्रीडमध्ये दरवाढ

loading image