ढगफुटी झाली, आम्ही नाही पाहिली, धडकी भरवणाऱ्या पावसाची शासनदप्तरी नोंद शून्य वाचा काय आहे प्रकार

The Official Record Of Cloudburst Rain In Chandgad Is Zero Kolhapur Marathi News
The Official Record Of Cloudburst Rain In Chandgad Is Zero Kolhapur Marathi News
Updated on

चंदगड : तालुक्‍याच्या विविध भागांत ढगफुटीसदृश पावसाच्या घटना वाढत आहेत. मंगळवारी शिरोली परिसरात, तर बुधवारी विंझणे परिसरात असाच पाऊस झाला. अडकूर-विंझणे मार्गावरील ओढ्याला पूर आला. मोरीत पाणी न सामावल्याने ते रस्त्यावरून वाहू लागले. हा प्रकार अनेकांनी पहिल्यांदाच पाहिल्याचे सांगितले; मात्र डोळ्यांना दिसणाऱ्या, धडकी भरवणाऱ्या या पावसाचे वास्तव शासनदप्तरी नोंद झालेले नाही. कारण नागनवाडी सर्कलमध्ये त्या दिवशी पावसाची नोंद शून्य झाली आहे. यावरून प्रत्येक गावात पर्जन्यमापकांची संख्या असण्याची गरज ठळक झाली आहे. 

पाच-सहा वर्षांपूर्वी चंदगड-आजरा हद्दीवर उचंगी परिसरात असाच पाऊस पडला. अर्ध्या-पाऊण तासाच्या अवधीत ओढ्याला प्रचंड पूर आला. दीड-दोन किलोमीटर हवाई अंतर असलेल्या कोळिंद्रे (ता. आजरा) येथे ओढ्याच्या पलीकडे शेतात काम करणाऱ्यांना याची काहीच कल्पना नव्हती. सायंकाळी घराकडे जाताना याच ओढ्याच्या पुरातून एक वृद्धा वाहून गेली. त्यावेळी क्वचित समजला जाणारा ढगफुटीसदृश पाऊस अलीकडे नियमितता धारण करताना दिसत आहे.

पावसाळ्यातील सर्वसाधारण पाऊस हा विशिष्ट लयीत पडतो. तो जमिनीवर प्रवाही होऊन सामावण्याची क्षमता असते; परंतु ढगफुटीसदृश पाऊस आभाळ फाटल्यासारखा कोसळतो. त्याचे रूप धडकी भरवते. जमिनीवर सामावला न गेल्याने लगेच पूरस्थिती निर्माण होते. ओढे, नाले दुथडी भरून वाहू लागतात. पडझडीच्या घटना घडतात. संसार उद्‌ध्वस्त होतात. पिके झोपतात. पान गळती, फळे गळती होते. गतवर्षी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पडलेला पाऊस आणि महापुराची स्थिती अशीच होती. त्यावेळी ढगांचा विस्तार मोठा होता; परंतु या वर्षीचा ढगफुटीसदृश पाऊस अर्धा- एक किलोमीटरच्या परिघात पडताना दिसला. 

सुरवातीला तालुक्‍याच्या ठिकाणी पर्जन्यमापकाची नोंद ही संपूर्ण तालुक्‍याची मानली जायची. अलीकडे शासनाने मंडलनिहाय प्रत्येक सज्जावर पर्जन्यमापक बसवले आहेत; परंतु मंडल परीक्षेत्राचा भौगोलिक विस्तार पाहता तो सुध्दा काटेकोर मानता येत नाही. त्यामुळे काटेकोर नोंद ठेवायची असेल, तर प्रत्येक गावात पर्जन्यमापकाची गरज आहे. 

चाळीस वर्षांत कधीच बघितले नव्हते
विंझणे-अडकूर मार्गावरील ओढ्याला एवढा पूर आल्याचे चाळीस वर्षांत कधीच बघितले नव्हते. अतिवृष्टीच्या काळातसुद्धा या ओढ्याला एवढे पाणी येत नाही तेवढे अर्ध्या तासाच्या पावसाने आले होते. 
- संदीप आर्दाळकर, अडकूर. 
 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com