esakal | हृदयद्रावक! जीवनयात्रा एकत्रच संपली, पत्नीवर अंत्यसंस्कार सुरु असताना पतीचा मृत्यू

बोलून बातमी शोधा

हृदयद्रावक! जीवनयात्रा एकत्रच संपली, पत्नीवर अंत्यसंस्कार सुरु असताना पतीचा मृत्यू
हृदयद्रावक! जीवनयात्रा एकत्रच संपली, पत्नीवर अंत्यसंस्कार सुरु असताना पतीचा मृत्यू
sakal_logo
By
ऋषिकेश राऊत

इचलकरंजी : कोरोनाबाधित महिलेवर (वय ७५) अंत्यसंस्कार सुरू असतानाच तिच्या बाधित पतीचाही (८५) येथील आयजीएम रुग्णालयात मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना घडली. या दांपत्याला अन्य नातेवाईक नसल्याने दोघांची मृत्यूनंतरही परवड झाली. मृत्यूनंतर महिलेचा मृतदेह १८ तास बेडवरच पडून होता. मृतदेहाला दुर्गंधी सुटल्यामुळे त्या वॉर्डातील रुग्ण रात्री व्हरांड्यात झोपले. दुसऱ्या दिवशीही हे रुग्ण व्हरांड्यात येऊन बसले होते. रुग्णांनी सतत विनवण्या केल्यानंतर दुपारी मृतदेह हलविण्यात आला. या प्रकारामुळे शहर सुन्न झाले आहे. काल (ता. २१) रात्री नऊ वाजता एका ज्येष्ठ महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पतीवगळता जवळचे कोणी नातेवाईक नव्हते.

पतीही कोरोना बाधित होते. त्यामुळे अंत्यसंस्कारासाठी रीतसर कार्यवाहीचा रुग्णालय प्रशासनासमोर गंभीर प्रश्‍न निर्माण झाला. रुग्णालयाने याची माहिती शिवाजीनगर पोलिसांना दिली. बारा तास उलटल्यानंतरही पोलिस रुग्णालयात आले नाहीत, त्यामुळे प्रश्‍न आणखी गंभीर बनला. महिलेचा मृतदेह बेडवरच प्लास्टिकमध्ये गुंडाळलेल्या स्थितीत होता. त्याच्या दुर्गंधीचा त्रास वॉर्डातील अन्य रुग्णांना होऊ लागला.

आज दुपारनंतरही मृतदेह बेडवरच होता. परिणामी, अन्य रुग्ण व्हरांड्यातच बसले. याबाबत वारंवार डॉक्‍टरांना विनवण्या केल्यानंतर पोलिसांना बोलावण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास शिवाजीनगर पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा केला. व्हाईट आर्मीच्या जवानांनी अखेर १८ तासांनंतर या कोरोनाबाधित महिलेवर अंत्यसंस्कार केले. दाम्पत्य पाच दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळले होते. पत्नीवर अंत्यसंस्कार सुरू असतानाच रुग्णालयात पतीचा मृत्यू झाला.

"बुधवारी रात्री कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना कळवली. नातेवाईक नसताना महिलेवर अंत्यसंस्कार करता येत नाहीत. याबाबत गुरुवारी दुपारी बारानंतर पुन्हा पोलिसांना सांगितले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन अंत्यसंस्कार करण्यात आले."

- डॉ. आर. आर. शेट्ये, वैद्यकीय अधीक्षक, आयजीएम रुग्णालय

हेही वाचा: घरीच बनवा हॉटेलस्टाईलचा बिर्याणी रायता; खास टिप्स