esakal | Kolhapur - नवरात्री संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर
sakal

बोलून बातमी शोधा

Kolhapur : श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी आजपासून ऑनलाईन बुकिंग सुरु

Kolhapur - नवरात्री संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : नवरात्रोत्सव केवळ दोन दिवसांवर असून उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. सार्वजनिक मंडळांना उत्सवासाठी परवानगी बंधनकारक असून चार फुटांच्याच मूर्तीची प्रतिष्ठापना करावी लागेल. कमीत कमी जागेत मंडप,. आरोग्यविषयक उपक्रमांवर भर द्यावा, मूर्तींचे पर्यावरणपूरक विसर्जन करावे, देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढू नयेत, आदी सूचनांचा त्यात समावेश आहे. रास-दांडिया कार्यक्रमापेक्षा आरोग्यविषयक उपक्रम घ्यावेत, धार्मिक कार्यक्रमांना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी. दसऱ्याचा कार्यक्रम मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करून त्याचे लाईव्ह प्रसारण करावे, अशा सूचनांचाही त्यामध्ये समावेश आहे.

दागिन्यांची स्वच्छता

करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात आज देवीच्या जडावाच्या व नित्य पूजेतील अलंकारांची स्वच्छता केली. दरम्यान, मंदिरात यंदा केवळ ऑनलाईन बुकिंग केलेल्या भाविकांनाच प्रवेश दिला जाणार असून शिवाजी चौक, भवानी मंडप ते मंदिराचा पूर्व दरवाजा या मार्गावर मुख्य दर्शन रांग असेल. याच रांगेला महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलपासून स्वतंत्र रांग जोडली जाणार आहे. महाद्वारात मुख दर्शनाची सोय असेल. त्यासाठी बिनखांबी गणेश मंदिरमार्गे दर्शनरांग असेल. त्याचे नियोजन निश्चित झाले असून उत्सवाच्या आदल्या दिवशी या ठिकाणी बॅरिकेडिंग केले जाणार आहे.

शिवाजी चौक आणि एमएलजी हायस्कूलजवळ थर्मल स्क्रिनिंग होणार असून त्यासाठी देवस्थान समितीने मशीन्स मागवली आहेत. याच ठिकाणी सॅनिटायझरचाही वापर केला जाईल. त्याशिवाय चप्पल स्टॅंड आणि पाण्याच्या टॅंकरसह वॉश बेसीनचीही सुविधाही येथे असेल. ऑनलाईन दर्शनासाठीची लिंक उद्या (मंगळवारी) ओपन केली जाणार असून त्यावर दर्शनासाठी बुकिंग करता येणार आहे. सायंकाळी चारच्या सुमारास ही लिंक सर्वांना उपलब्ध होईल. दर्शनासाठी येताना चप्पलचा वापर टाळावा, असे आवाहन सचिव शिवराज नाईकवाडे यांनी केले आहे. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पालखी सोहळा होणार असल्याचेहीत्यांनी सांगितले.

नियम पाळूनच गुरुवारपासून मंदिरे खुली

कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करतच गुरुवार (ता. ७) पासून जिल्ह्यातील धार्मिक व प्रार्थनास्थळे खुली करण्यास आज जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परवानगी दिली. याबाबतच्या मार्गदर्शक सूचनाही दिल्या आहेत. दहा वर्षांखालील मुले, पासष्ट वर्षांवरील ज्येष्ठांना प्रवेश नसेल. सोशल डिस्टन्स, मास्क, सॅनिटायझर बंधनकारक असेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास प्रतिबंध असेल. प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटायझर बंधनकारक असून कुठलीही लक्षणे नसलेल्यांनाच प्रवेश असेल. वारंवार धार्मिक व प्रार्थनास्थळांचे निर्जुंतुकीकरण करावे. प्रतिबंधात्मक नियमांबाबतचे फलक सर्वांना दिसतील, अशा ठिकाणी लावावेत, आदी मार्गदर्शक सूचनांचा यामध्ये समावेश आहे.

व्यापाऱ्यांची बैठक व निवेदन

महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाला दिले. नवरात्रात वाहतुकीसाठी महाद्वार रोड बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याने व्यापाऱ्यांत असंतोष आहे. दुपारी सराफ व्यापारी संघाच्या कार्यालयात बैठक झाली. महाद्वार रोड व्यापारी असोसिएशननेही प्रशासनाच्या निर्णयास विरोध केला होता. सायंकाळी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली.

तत्पूर्वी झालेल्या बैठकीत महाद्वार रोड वाहतुकीसाठी बंद राहिल्यास व्यापाऱ्यांचे नुकसान होईल. दसऱ्याच्या निमित्ताने महाद्वार रोडवर वर्दळ असते. व्यापाराचे चार दिवस चालून आले असताना वाहतूक बंद केल्यास लोकांना खरेदीसाठी रोडवर येणे मुश्‍कील होईल. ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणावर व्यापारी येतात. त्यांना ये-जा करणे मुश्‍कील होईल.वाहतूक बंद करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध आहे. जिल्हा प्रशासनाने तोडगा काढावा, अशी मागणी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने केली. किमान रिक्षा तसेच दुचाकीस्वारांना परवानगी द्यावी, अशी मागणी केली. सराफ संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड, किरण नकाते. ॲड. अजित ठाणेकर, बाबा इंदुलकर, अनिल पोतदार, प्रीतम ओसवाल, मनोज बहिरशेट, जयंत गोसावी आदींचा समावेश होता.

दरम्यान, जोतिबा रोडवर असणाऱ्या फूल विक्रेत्यांना फुले रात्री रस्त्यावरच ठेवता येणार नाहीत. दुसऱ्या दिवशी त्यांना ती सोबत आणता येतील. राजवाडा पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आश्‍वासन व्यापाऱ्यांनी दिले. फेरीवाले नवरात्रीच्या काळात शिस्तीने व्यवसाय करतील. गुजरीतून दुचाकीला परवानगी द्यावी, अशी मागणी झाली.

loading image
go to top