
Kolhapur City Government : कोल्हापूर शहर हद्दवाढीला विरोध होत असल्याने राज्य शासनाने आठ वर्षांपूर्वी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना केली. या प्राधिकरणामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या सभोवताली असणाऱ्या ४२ गावांचा समावेश केला आहे. गेल्या आठ वर्षांत प्राधिकरणाकडून या गावांतून कोट्यवधींचा महसूल जमा केला आहे, मात्र यापैकी एकाही गावाला विकास निधी म्हणून दमडीही दिलेली नाही. याउलट या रकमेचा वापर अधिकारी, कर्मचारी यांचा पगार आणि आस्थापनेवरील खर्चासाठी होत आहे. त्यामुळे कोल्हापूर प्राधिकरण गावच्या विकास करण्यासाठी स्थापन केले आहे की, कर्मचाऱ्यांना पोसण्यासाठी केले आहे, असा सवाल विचारला जात आहे.