
Kolhapur Radhanagari Dam : कोल्हापूर शहरात उघडझाप असली, तरी धरणक्षेत्रात पडणाऱ्या जोरदार पावसामुळे नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने नृसिंहवाडीतील श्री. दत्त मंदिरासमोर दोन फूट पाणी आले आहे. आज भाविकांनी मंदिरासमोरील पाण्यातूनच दर्शन घेतले. दरम्यान, पंचगंगा नदीची पाणी पातळी रात्री २८ फूट चार इंचावर पोहोचली. पावसाचा जोर वाढल्यास पातळीत वाढ होऊन केव्हाही पाणी पात्राबाहेर पडण्याची स्थिती आहे. जिल्ह्यात आज दिवसभरात २३.७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे, तर १९ बंधारे पाण्याखाली गेले. त्याचबरोबर हवामान खात्याने उद्या, रविवारी जिल्ह्यात ऑरेंज अलर्टचा अंदाज वर्तविला आहे.