Kolhapur News : पाम वाढतो जोमात;भूजलसाठा जातो खोलात!

तेरवण-मेढेसह घाटामध्ये मोठी लागवड ः तमिळनाडू, आंध्रात बंदी
Palm Large-scale cultivation in ghats including Teravan-Medha Banned in Tamil Nadu Andhra
Palm Large-scale cultivation in ghats including Teravan-Medha Banned in Tamil Nadu AndhraSakal

कोल्हापूर : केंद्र सरकारने पाम लागवडीसाठी अनुदान जाहीर केले आणि पश्‍चिम घाटात पामची लागवड वाढली. विदेशी वृक्ष असलेल्या पामची झाडे दोडामार्गातून तिलारी घाटाकडे जाताना अगदी सर्रास पाहायला मिळू लागली आहेत. तेरवण मेढे परिसरात वनविभागाच्या संशोधन वनपरिक्षेत्रातही त्याची लागवड केल्याचे दिसते. पामची एकसुरी लागवड भूजलसाठा कमी करण्यासाठी कारणीभूत ठरते हे माहिती असूनही लागवड वाढत आहे ही चिंतेची बाब आहे.

पश्‍चिम घाटामध्ये फिरताना अंबोली घाट ओलांडून दोडामार्गच्या रस्त्याला लागल्यानंतर दाट जंगलामधील विविध प्रकारचे वृक्ष नजरेस पडत होते. त्यातच पामचे वृक्षही दिसले. तिलारी संवर्धन राखीव क्षेत्राच्या फलकाजवळ असलेल्या कमानीमधून थेट संशोधन वनपरिक्षेत्रात प्रवेश केला असता तेथे पामच्या वृक्षांची सलग लागवड केल्याचे दिसले.

सुमारे २४ मीटरपर्यंत उंची वाढलेल्या पामला तेलमाड म्हणूनही तो ओळखतात. ही झाडे पाहिल्यानंतर पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मधुकर बाचूळकर यांनी पश्‍चिम घाटात पामच्या केलेल्या लागवडीवर आक्षेप नोंदवला.

देशातील लोकसंख्येच्या तुलनेत तेलाचे उत्पादन कमी पडते. त्यामुळे पामच्या लागवडीतून तेलाचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न केला जात असला तरी घाटातील नैसर्गिक जंगलाचा ऱ्हास घडवून पामची लागवड करणे अयोग्य असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

पामच्या एकरी लागवडीसाठी रोज १४ हजार ५०० लिटर भूजल लागते. फळधारणा होण्यास वर्षाचा कालावधी लागतो. परागीभवनासाठी आफ्रिकेतून कीटक आयात करावे लागतात. आंध्र प्रदेश, तमिळनाडूत पाम लागवडीमुळे भूजल पातळी खोलवर गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. श्रीलंकेत पामच्या लागवडीवर कायमची बंदी आणली आहे.

इंडोनेशिया पाम तेलाचा मोठा निर्यातदार देश असूनही या देशाने पाम लागवड बंद केली आहे. हा देश जुने जंगल पूर्ववत करण्याच्या तयारीत आहे. आंध्र प्रदेश, तमिळनाडूतील शेतकऱ्यांनी पाम लागवड बंद केली आहे. असे असताना पश्‍चिम घाटाला उद्‌ध्वस्त करण्याचे कारणच काय? असा प्रश्‍न बाचूळकर यांनी उपस्थित केला.

तेरवण-मेढेसह घाटात ठिकठिकाणी डोंगरांवर पाम वृक्ष दिसत होते. स्थानिकांना मात्र त्याचे दुष्परिणाम माहीत नसल्याची स्थिती दिसून आली. पामला २ हजार ५०० मिलिमीटर पाऊस लागतो. देशात हे प्रमाण निम्मे आहे. नर वृक्षांचे प्रमाण वाढल्यास एकरी उत्पादन घटते. पामची लागवड केवळ २५ वर्षे फळ देते.

सद्य:स्थिती

  • पामच्या लागवडीकडे लोकांचा वाढता कल

  • त्याच्या निसर्गावरील दुष्परिणामाबाबत अनभिज्ञता

  • नैसर्गिक जंगल नष्ट करून वाढती लागवड

  • केंद्राकडून मिळणाऱ्या सबसिडीचा लाभ उठविण्यासाठी लोक उत्सुक

परिणाम

  • भूजल पातळीमध्ये मोठी घट

  • पाम वृक्षपरिसरातील अन्य वनस्पतींची वाढ खुंटते

  • वन्यजीवांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होतो

  • दाट जंगलातील वाढ पर्यावरणास धोकादायक

असा आहे पाम वृक्ष

  • पश्‍चिम व मध्य आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशातील मूळ वृक्ष

  • गियाना, ब्राझील, वेस्ट इंडिज बेटांवर अधिक प्रमाण

  • मांसल सालीपासून ३० ते ७० टक्के पामतेल

  • बियांतील मगजापासून ४४ ते ५३ टक्के पाम मगज तेल

  • साबण, मेणबत्ती, शुद्ध तेल, औषधे व सौंदर्यप्रसाधनात वापरासाठी उपयोग

नैसर्गिक जंगलांची तोड झाल्याने वन्यजीवांचा अधिवास नष्ट होतो. पश्‍चिम घाटात पामसारख्या विदेशी वृक्षांची लागवड करणे धोकादायक आहे. त्याकडे लक्ष वेधायला हवे. पामची वाढती लागवड वेळीच न रोखल्यास घाटाचा ऱ्हास होण्यास वेळ लागणार नाही.

- डॉ. मकरंद ऐतवडे, वनस्पती तज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com