
पन्हाळा : दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू
बाजार भोगाव : पोहाळे तर्फ बोरगाव व बाजार भोगाव (ता. पन्हाळा) गावांच्या हद्दीवर दोन गव्यांच्या झुंजीत एकाचा मृत्यू झाला. गव्यांच्या झुंजीत सुमारे पाच गुंठ्यातील उसाची नासाडी झाली. याबाबत घटनास्थळ व बाजार भोगाव परिमंडळ वन अधिकारी नाथाजी पाटील यांनी दिलेली माहिती अशी : गव्यांचा कळप पोहाळे तर्फ बोरगाव व बाजार भोगाव हद्दीवरील पाय वाटेने गाव शिवारामध्ये येत होता. वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने दोन गव्यांची झुंज सुरू झाली. झुंज करत दोन्ही गवे आनंदा गणपती पाटील (रा. पोहाळे तर्फ बोरगाव, ता. पन्हाळा) यांच्या ‘शिव’ नावाच्या उसाच्या शेतात आले. दोन्ही गव्यामध्ये तुंबळ झुंज झाली. तेथूनच दोन्ही गवे तानाजी पाटील यांच्या शेतात पोहोचले. झुंजीमुळे दोन्ही शेतातील सुमारे पाच गुंठ्यातील ऊसाची नासाडी झाली. अखेर या दोन गव्यांच्या झुंजीत दमलेल्या एका गव्याचा हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाला. आज सकाळी शेतीकामासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या मृत्युमुखी पडलेला गवा दिसला. त्यांनी वनकर्मचाऱ्यांशी संपर्क साधून ही माहिती दिली.
बाजार भोगावचे परिमंडळ वन अधिकारी नाथा पाटील, वनरक्षक कुंडलिक कांबळे, महादेव कुंभार, संगीता देसाई, वनमजूर बाळू म्हामुलकर, नाथा पाटील, यशवंत पाटील, शंकर पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मृत गव्याच्या अंगावर शिंगे लागल्याच्या खुणा आढळल्या.दरम्यान, मृत गव्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित रानभरे यांनी शवविच्छेदन केले. त्यानंतर मृत गव्यावर शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.
वर्चस्व मिळवण्याच्या हेतूने दोन बलाढ्य गव्यांमध्ये मोठी झुंज झाली. त्यात दमलेल्या गव्याची हृदयक्रिया बंद पडून मृत्यू झाल्याचे अनुमान पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढले आहे. विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला आहे.
... नाथाजी पाटील, वनपाल, बाजार भोगाव
Web Title: Panhala One Killed Fight Two Cows
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..