esakal | ब्रेकिंग; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त, जिल्हाधिकारी प्रशासक

बोलून बातमी शोधा

paschim maharashtra devasthan samesite dissolve in kolhapur decision of district administration

राज्य सरकारच्या विधी आणि न्यायविभाग यांनी हा आदेश काढला आहे. 

ब्रेकिंग; पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त, जिल्हाधिकारी प्रशासक
sakal_logo
By
नंदिनी नरेवाडी

कोल्हापूर : भाजपचे अध्यक्ष असलेली पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती बरखास्त करण्याचे आदेश आज राज्य शासनाने काढले. या समितीवर प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी दौलत देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाच्या या आदेशामुळे समितीचे अध्यक्ष व भाजपचे महेश जाधव यांच्यासह सहा सदस्यांचे कार्यकाळ संपुष्टात आला. राज्य सरकारच्या विधी आणि न्यायविभाग यांनी हा आदेश काढला आहे. 

कोल्हापुरसह सांगली व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील सुमारे तीन हजार 42 मंदिराचा महसुलासह त्यावरील नियंत्रणाची जबाबदारी या समितीकडे होती. 2010 ते 2017 या काळात समितीला अध्यक्षच नव्हते, निवडच न झाल्याने या पदाचा कार्यभार जिल्हाधिकाऱ्यांकडे होता. राज्यात 2014 साली भाजप शिवसेना युतीचे सरकार आल्यानंतरही पहिली तीन वर्षे या समितीला अध्यक्ष व सदस्यच नव्हते. 16 ऑगस्ट 2017 रोजी राज्य शासनाने समितीच्या अध्यक्षपदी महेश जाधव यांची तर सदस्य म्हणून शिवाजी जाधव, वैशाली क्षीरसागर, राजाराम गरूड, राजेंद्र जाधव, चारूदत्त देसाई यांची नियुक्ती करण्यात आली. गेली चार वर्षे या समितीमार्फत कामकाज सुरू होते. 

राज्यात 2019 मध्ये शिवसेना - राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांचे मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर गेल्या दीड वर्षात या सरकारने भाजपाचे अध्यक्ष व सदस्य असलेल्या राज्यस्तरीय समित्या व महामंडळे बरखास्त करून तेथे तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची वर्णी लावण्याची तयारी सुरू केली आहे. पण पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवर मात्र भाजपनियुक्त अध्यक्ष व सदस्यच कार्यरत होते. आज राज्य शासनाने अध्यक्षांसह समितीचा कार्यकाल संपुष्टात आणून जिल्हाधिकारी यांच्याकडे अध्यक्षपदाचा कार्यभार देत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनाच धक्का दिल्याचे बोलले जाते.