अन् खडी फोडून गुजरान करणाऱ्या त्यांच्या पालावरच्या चुली पेटल्या...

people help to Wandering community in nanibai chikhali kolhapur
people help to Wandering community in nanibai chikhali kolhapur
Updated on

नानीबाई चिखली (कोल्हापूर) - टीचभर पोटाची इतभर खळगी भरण्यासाठी त्यांनी आपली माती, आपली माणसं सोडली. कमावून खाण्यासाठी परराज्यातून शेकडो किलोमीटर येत त्यांनी रोजगार मिळविला. निवार्‍यासाठी रस्त्याच्या कडेलाच आपली पाले उभी करीत कष्टाची कामे सुरू केली. पंधरा दिवसांपूर्वी त्यांच्या हातातील कामे संपली. बंदीमुळे ठेकेदार देखील भेटेना झाला. तशातच साठवलेली पुंजी देखील संपली. आता हात कुणाकडे पसरायचे, चूल कशी पेटवायची. अशी परिस्थिती त्यांच्यावर आली असतानाच माजी विद्यार्थी मंडळाने समाजभान जपत भेट घेत त्यांना मदत केली. त्यांच्या मदतीमुळेच पाल्यावरच्या चुली पेटल्या गेल्या. 

अर्जुनी (ता.कागल) ते गायकवाडी रस्ता कामावर खडी फोडण्यासाठी विजापूर, शिमोगा या कर्नाटक भागातून आलेली लमाणींची सात कुटुंबे. खडी फोडण्याची कामे करीत असतानाच त्यांनी रस्त्याकडेला फोंड्या माळावर आपली पाले उभारली. पाल्यामध्ये सोळा मोठे स्त्री- पुरूष तर पंधरा लहान मुले. दिवसभर खडी फोडायचे व सायंकाळी मिळेल ते खात झोपी जायचे. रोजचाच त्यांचा दिनक्रम. खडी फोडण्याची त्यांच्याकडे असलेली कामे पंधरा दिवसांपूर्वीच संपलेली. ठेकेदाराने दुसरे काम न घेतल्याने त्यांनी इतर कामे मिळविण्यासाठी हातपाय हलविले. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशामध्ये पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे गेले पंधरा दिवस त्यांच्या हाताला काम मिळाले नाही. संचारबंदीने त्यांना गावी देखील जाता आले नाही. अशातच साठवलेली पुंजी देखील संपली. दररोजची चूल पेटवायची कशी असे अनेक प्रश्‍न त्यांच्यासमोर उभी राहिले होते.

अशावेळी मोहनलाल दोशी विद्यालयाचे माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष विक्रम घाटगे, उपाध्यक्ष हर्षल कदम, सचिव रमेश देसाई, निहाल पटेल, नामदेव चौगुले, उत्तम पाटील, प्रदीप पावले, प्रवीण शिंदे, दीपाली कांबळे, कपिल शिंदे, वृषाली सोनाळकर, आर. एस. भोसले आदींनी कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेताना त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर ताबडतोबीने गहू, तांदूळ, खाद्यतेल, डाळी, कडधान्य, साखर, चहा, पोहे, रवा, मीठ, साबण आदी जीवनावश्यक साहित्य खरेदी करत प्रत्यक्ष जागेवर जाऊन दिले. 

तसेच जोपर्यंत लॉकडाऊन उठत नाही तोपर्यंत येथेच रहावे असे सांगतानाच उर्वरित काळासाठी त्यांना लागेल ती मदत विद्यार्थी मंडळ तसेच सुशीला मगदूम वाचनालयाच्या माध्यमातून पुरविण्याचे आश्वासन दिले. लॉकडाऊनमुळे गावागावातील प्रत्येक कुटुंबीयांनी घराची दारे बंद केलेली आहेत. मात्र मनाची, माणुसकीची दारे अजूनही सताड उघडी असल्याची यामुळे पहायला मिळाल्याचे प्रकाश राठोड यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khashaba Jadhav biopic Marathi movie
Gagangad fort declared state protected monument
PWD branch engineer arrested for taking bribe
arun dongle
Marathi News Esakal
www.esakal.com