esakal | हिंमत असेल तर खरोखरच समोरासमोर येऊन मते मांडा...

बोलून बातमी शोधा

politics on direct pipeline in kolhapur comment war

कोल्हापुरात चॅलेंजची भाषा सुरू झाली आहे. अर्थात ही चॅलेंज राजकीय आहेत. जागा, प्लॉट, कोणी किती मिळवले?, कोणी किती कमावले?, कोणी किती निधी आणला?, कोणी किती निधी खर्च केला, यासंदर्भातील आहेत. कुठे येऊ सांग?, कधी येऊ सांग?, हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या अशी भाषा आहे.

हिंमत असेल तर खरोखरच समोरासमोर येऊन मते मांडा...
sakal_logo
By
सुधाकर काशीद

कोल्हापूर - ‘चॅलेंज’ हा कोल्हापूरच्या दादागिरी परंपरेतला एक परवलीचा जुना शब्द आहे. कुठे येऊ सांग ? किंवा कुठे येणार सांग ? या भाषेत दादा लोक एकमेकाला चॅलेंज द्यायचे. हे चॅलेंज कशासाठी ? तर, पेठेतल्या गल्लीतल्या एखाद्या गरिबावर कोणी अन्याय केला तर त्या विरोधात असायचे, त्यावेळचे दादा लोक स्वाभिमानसाठी चॅलेंज द्यायचे, चॅलेंज स्वीकारायचे, समोरासमोर या !  असे चॅलेंज दिले तर तारीख, वार, वेळ ठरवून समोरासमोर यायचे, एकमेकाला धोपटून, मार देऊन, मार खाऊन परत जायचे; पण आपले चॅलेंज खरे करायचे.

थेट पाईपलाईनचे राजकारण

आताही कोल्हापुरात चॅलेंजची भाषा सुरू झाली आहे. अर्थात ही चॅलेंज राजकीय आहेत. जागा, प्लॉट, कोणी किती मिळवले?, कोणी किती कमावले?, कोणी किती निधी आणला?, कोणी किती निधी खर्च केला, यासंदर्भातील आहेत. कुठे येऊ सांग?, कधी येऊ सांग?, हिंमत असेल तर एका व्यासपीठावर या अशी भाषा आहे, पण ही सर्व चॅलेंज हवेतले बुडबुडे आहेत, याची कोल्हापूरकरांना खात्री आहे. आजवर अनेक राजकीय नेत्यांनी कोल्हापुरात बिंदू चौकात समोरासमोर येण्याची आव्हाने दिली आहेत; पण एकही नेता कधी हे आव्हान स्वीकारून समोरासमोर आलेला नाही, हा इतिहास आहे. किंबहुना अशी चॅलेंज फक्त द्यायची असतात, ती प्रत्यक्षात आणायची नसतात, हे ठरवूनच ही आव्हान प्रतिआव्हानची भाषा वापरली जात आहे. यातून काही निष्पन्न होणार नाही. कोणीही नेता एका व्यासपीठावर समोरासमोर येणार नाही, याची लोकांनाही खात्री आहे. पण या निमित्ताने एकमेकांच्या जागा एकमेकांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे याची रंजक माहिती मात्र लोकांना घरबसल्या कळू लागली आहे.

वाचा - सतेज पाटील या विषयावर समोरासमोर चर्चेस तयार....

कोल्हापुरात आजवर करवीर, पन्हाळा, कागल, शिरोळ, इचलकरंजी, कोल्हापूर शहर इथल्या राजकारणात एका व्यासपीठावर येण्याची आव्हानात्मक भाषा त्या त्या राजकीय परिस्थितीत अनेक वेळा वापरली गेली आहे; पण एकदाही कोणी समोरासमोर आलेला नाही. उलट एकमेकाला टोकाची भाषा वापरून आव्हान देणाऱ्यांनी बदलत्या राजकारणात एकमेकांच्या गळ्यात गळे कसे घातले, हेही लोकांनी पाहिले आहे.
या पार्श्वभूमीवर आता थेट पाईपलाईनच्या मुद्द्यावर पालकमंत्री सतेज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांच्यातला पारंपरिक वाद पुन्हा उफाळला आहे. त्या निमित्ताने एका व्यासपीठावर येण्याचे चॅलेंज दिले जाऊ लागले आहे. हे दोघे एरवी एकमेकासमोर एखाद्या समारंभात आले तरी एकमेकांकडे बघत नाहीत आणि एकमेकांच्या भ्रष्टाचाराच्या फायली घेऊन ते एका व्यासपीठावर येणे तर लांबची गोष्ट आहे. पण तरीही ही भाषा चालूच आहे. अर्थात तो लोकांच्या करमणुकीचा विषय ठरू लागला आहे.

वाचा - सतेज पाटील यांचे आव्हान आम्ही स्वीकारले... तारीख, वेळ आणि ठिकाण कळवा...

लेखक मंडळींचा स्टाफ

आव्हान-प्रतिआव्हानची भाषा शेलक्‍या शब्दात कागदावर उतरवणारी ‘लेखक‘ मंडळी पाटील व महाडिक गटाकडे सक्रिय आहेत. त्यांची पत्रके म्हणजे सवाल-जवाबाचा फडच असतो. छोटा मुद्दाही बरोबर मोठा केला जातो. यासाठी वेगळा स्टाफ हे सारे काम करतो. त्यासाठी हस्तलिखितापासून, ईमेलचाही वापर केला जातो, किंबहुना हा वाद फुलवत ठेवण्यात या लेखक मंडळींचा मोठा वाटा ठरतो.