कोल्हापूर उत्तरसाठी आज मतदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

voting

कोल्हापूर उत्तरसाठी आज मतदान

कोल्हापूर - राज्यातील दिग्गज नेत्यांच्या प्रचार, आरोप-प्रत्यारोप आणि प्रचंड ईर्षेने गाजलेल्या आणि महाराष्ट्राच्या राजकीय पटलाचे लक्ष वेधलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उद्या (ता. १२) मतदान होत आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ दरम्यान मतदान होणार आहे. शनिवारी (ता. १६) राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम येथे सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. या निवडणुकीच्या रिंगणात १५ उमेदवार असले तरी खरी लढत महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार श्रीमती जयश्री जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यातच आहे. ही पोटनिवडणूक राज्यातील राजकारणाची पुढील दिशा ठरवणारी असल्याचे कारणामुळे राज्यातील महाविकास आघाडी व भाजपच्या दिग्गज नेत्यांना कोल्हापुरातच तळ ठोकून रहावे लागले. आरोप-प्रत्यारोपांच्या तोफांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले. त्यामुळेच या निवडणुकीच्या निकालाविषयीही मोठी उत्सुकता आहे.

या मतदारसंघाचे आमदार दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या अकाली निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक होत आहे. सुरुवातीला ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सुरू होते, पण त्यांचा प्रस्ताव भाजपने मान्य न केल्याने ही निवडणूक होत आहे. या मतदार संघात महापालिकेचे ५३ प्रभाग येतात. त्यात कसबा बावडा व शिवाजी पेठ हा मतदारसंख्या मोठी असलेल्या भागांचा समावेश आहे. कसबा बावडा परिसरावर पालकमंत्री सतेज पाटील यांचा प्रभाव असल्याने हे दोन भाग या निवडणुकीत निर्णायक आहेत. परिणामी या दोन्ही भागांवरच दोन्ही उमेदवारांनी जोर दिला आहे.

या निवडणुकीच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, केंद्रीय मंत्री रामदास आठवले आदी दिग्गजांच्या तोफा धडाडल्या. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून शिवसैनिकांसह महाविकासच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. दोन्ही बाजुंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने यात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे.

दोन पाटलांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या श्रीमती जाधव व भाजपकडून सत्यजित कदम रिंगणात असले तरी त्यांच्या प्रचारार्थ सक्रिय भाग घेतलेले पालकमंत्री सतेज पाटील व माजी पालकमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या दोन पाटलांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सतेज पाटील हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तर चंद्रकांत पाटील हे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे या निवडणुकीत कोणीही विजयी झाले तरी पराभव मात्र या दोघांचाच झाला असे होणार असल्याने या दोघांनी मोठी ताकद या निवडणुकीत लावली आहे.

दृष्टिक्षेपात मतदारसंघ

एकूण मतदार - २ लाख ९१ हजार ४३९

महिला मतदार - १ लाख ४५ हजार ८३७

पुरुष मतदार - १ लाख ४५ हजार ५९०

दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक - ६८८

इतर - १२

मतदान केंद्रे - ३५७

Web Title: Polling For Kolhapur North Vidhansabha Potnivadnuk Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top