esakal | गणेशोत्सवात जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांवर दराचे संकट; आर्टिफिशल फुलांना अधिक भाव
sakal

बोलून बातमी शोधा

जरबेरा

जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांवर दराचे संकट; आर्टिफिशल फुलांना अधिक भाव

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जयसिंगपूर: ऐन गणेशोत्सवात जरबेरा उत्पादक शेतकऱ्यांवर दराचे संकट विघ्न कोसळले आहे. दोन दिवसांत जरबेरा दर निम्याने कमी होऊन तो दोन रुपयांवर स्थिरावल्याने जरबेरा फूल उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. खऱ्याखुऱ्या फुलांपेक्षा आर्टिफिशल फुलांच्या माळांना अधिक चांगला भाव मिळत असल्याने फुल उत्पादकांमध्ये नाराजी पसरली आहे. बदलत्या वातावरणाचा फटका बसत असताना दर आणि वाढत्या खर्चाचा दुहेरी फटका बसत आहे.

हेही वाचा: शॉकने संपवले माऊलीचे जीवन; लेकराचा 'लळा' पाहून गावही हळहळले

दोन वर्षांपासून जरबेरा उत्पादकांना लॉकडाऊनचा फटका बसत आहे. लग्न समारंभ, कार्यक्रमांना परवानगी नसल्याने व मंदिरे बंद असल्याने फुलांच्या मागणीत घट झाली. मुंबई, पुणे, हैदराबाद, बडोदरा, बेंगलोर ही जरबेरा फुलाची मुख्य बाजारपेठ आहे. मात्र, मागणीच नसल्याने मध्यंतरी शेतकऱ्यांना उत्पादित जरबेरा फेकून द्यावा लागला होता. काही दिवसांपासून लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर कार्यक्रमांना परवानगी मिळाली.

हळूहळू चांगला दर मिळेल या आशेवर असणाऱ्या फुल उत्पादकांना पदरी निराशा आली आहे. दोन दिवसांपूर्वी फुलांमागे चार रुपये दर होता तो आता दोन रुपयांवर आला आहे. गणेशोत्सवात फुलांना किमान आठ ते दहा रुपये दर मिळेल, अशी अपेक्षा होती.

फुलाला सात ते आठ रुपये दर मिळाला तरच उत्पादक नफ्यात राहतो. मात्र, नफा तर दूरच उत्पादन खर्चही निघणे मुश्कील बनले आहे. मार्च ते जुलैकडे हंगाम म्हणून पाहिले जाते. या काळात लग्नसराई सुरू असते. आपोआपच फुलांना मागणी वाढून शेतकऱ्यांच्या पदरी चार पैसे पडतात. मात्र, कार्यक्रमांवर मर्यादा आणि मंदिरे बंदचा फटका उत्पादकांना बसला आहे.

दर नाही; अनुदानही बंद

गेल्या दोन वर्षात जरबेऱ्याला दर नाही. शासनाने अनुदानही दिले नाही. त्यामुळे कर्जावरील व्याज वाढत आहे. वाढीव खर्च, दर आणि अनुदान अशा तिहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. नजीकच्या कर्नाटक राज्यात ७० टक्क्यांपर्यंत अनुदान शेती मशागतीपासून दिले जाते. इथे मात्र अनुदान नाहीच दराची शाश्वतीही नाही.

हमीभाव हवा

फुल पिकाला हमीभाव नसल्याने दराचा प्रश्न निर्माण होतो. किमान दर निश्चित केल्यास फुल उत्पादक मोठ्या नुकसानीपासून वाचेल. अन्य पिकांप्रमाणे फुलनाही हमीभाव हवा. फुलशेतीला एकरी ६८ लाख रुपये खर्च येतो. औषधे, खते, मजुरीच्या खर्चात वाढ झाली असताना त्या तुलनेत दर मिळत नाही. शासनाने फुलांना हमीभाव देण्याची गरज आहे. खऱ्या फुलांपेक्षा आर्टिफिशल फुलांना अधिक दर मिळत असल्याने फुल उत्पादकांकडे शासनाचे किती दुर्लक्ष आहे हे लक्षात येते. -जोतिराम जाधव, जरबेरा उत्पादक

loading image
go to top