आंबोली घाटाला जाळीचे संरक्षण | Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आंबोली घाटाला जाळीचे संरक्षण

कोल्हापूर : आंबोली घाटाला जाळीचे संरक्षण

sakal_logo
By
- लुमाकांत नलवडे

कोल्हापूर : आता आंबोली घाटात दरड कोसळली तरीही महामार्ग बंद होणार नाही, भूस्खलन झाले तरीही अपघात होणार नाही. यासाठी २०१९ मध्ये मंजूर झालेल्या निविदेचे काम सुरू झाले आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याची अट ठेकेदाराला घातली आहे. ठाण्यातील कंपनीला याचा ठेका मिळाला असून, घाटात वायर मेश (जाळी) आणि ‘बॅरीड’ अशा दोन्ही प्रकारे तेथे संरक्षण केले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून काम सुरू झाले आहे. पुढील १० वर्षांसाठी त्याची देखभाल दुरुस्ती कंपनीकडे असणार आहे.

वेंगुर्ले-आंबोली-बेळगाव हा मार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८-एच म्हणून घोषित झाला. या मार्गावर पावसाळ्यात वारंवार दरड कोसळतात, त्यातून वाहतूक बंद करावी लागते.

हेही वाचा: नागपूर : वेदांतीचे सप्तखंजेरी वादनातून समाज प्रबोधन

राष्ट्रीय संपत्तीचे आणि खासगी असे दोन्ही प्रमाणात नुकसान होते. ही हानी टाळण्यासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) यांच्या प्राध्यापकांनी अभ्यास करून तेथे वायर मेश (जाळी) आणि ‘बॅरीड’ अशा दोन्ही पद्धतीचे संरक्षण करता येईल, असा अभिप्राय दिला आहे.

यासाठी १३ सप्टेंबर २०१९ मध्ये याची निविदा प्रक्रिया झाली. यात चार ठेकेदारांनी निविदा भरली होती. ठाणे येथील कंपनीला ठेका मिळाला; मात्र निधी मंजूरच न झाल्यामुळे ही प्रक्रिया थांबली होती. नुकतीच ही निविदा खुली केली. सध्या कामाला निधी उपलब्ध झाल्यामुळे २०२२ च्या पावसाळ्यापूर्वी आंबोली घाटात ठिकठिकाणी जाळी व लोखंडी बार बसवले जाणार आहेत. दरड थेट महामार्गावर येणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे. यासाठी ४४.५२ कोटींचा हा प्रकल्प असल्याचे म्हटले आहे. प्रत्यक्षात २१ कोटींना निविदा मंजूर झाल्याचे अधिकारी सांगतात.

‘एनएचआय’कडून हा रस्ता हस्तांतर झाला आहे. २०१९ चे काम निधी नसल्यामुळे थांबले होते. यावर्षी निधी मिळाल्यामुळे सुरू केले आहे. पायोनियर या ठाण्याच्या कंपनीला काम दिले आहे. २१ कोटींचे हे काम असून, ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावयाचे आहे. यातून कोसळणारी दरड ‘ट्रॅप’ केली जाईल. यामुळे दरड कोसळली तरीही ती महामार्गावर पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल.

- सचिन सांगावकर, कार्यकारी अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग, कोल्हापूर

loading image
go to top