वेदांतीचे सप्तखंजेरी वादनातून समाजप्रबोधन | Nagpur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कीर्तनकार

नागपूर : वेदांतीचे सप्तखंजेरी वादनातून समाज प्रबोधन

नागपूर : लहानगी वेदू आपल्या काकांना गायन, वादन करताना बघायची. तीला त्याची एवढी आवड निर्माण झाली की ती आता सप्तखंजेरी वादनात प्रवीण झाली आहे. विशेष म्हणजे आपल्या अमोघ वाणीतून सध्या १५ वर्षांची असलेली वेदांती नारायण मुळेकर हुंडाबळी, व्यसनमुक्ती याबाबतीत प्रबोधनाचे कार्य करत असून थोर संत, महापुरुषांचे विचार सरळ, सोप्या भाषेत जनसामान्यांपर्यंत पोचवत आहे.

वेदांतीच्या कुटुंबामध्ये आधीपासून दररोज सायंकाळी सामुदायिक कीर्तनाची परंपरा आहे. वेदांतीचे काका माणिकराव यांना वादन, गायनाची आवड. परंतु, नोकरी व इतर काही खासगी कारणांमुळे त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात झोकून काम करता आले नाही. त्यांची ही होणारी घुसमट वेदांतीला बालपणापासून दिसत होती. त्यामुळे तिने गंभीरपणे वादन, गायनाकडे लक्ष्य केंद्रित केले.

हेही वाचा: सोलापूर : केगाव- विजयपूर बायपास अंतिम टप्प्यात

आठव्या वर्गात असताना अंबिका नगर येथे तिने पहिला कार्यक्रम केला. त्यातून मिळालेल्या आत्मविश्वासातून तिने जिल्हाभर कार्यक्रम केले. वादनासह वेदांतीने थोर संत महात्मे, समाजसुधारक व महापुरुषांची पुस्तके वाचायला सुरुवात केली. त्यांचे विचार ती सप्तखंजेरी वादनाच्या कार्यक्रमात प्रभावीपणे मांडते. श्रोत्यांसह समाजातील इतर नागरिकांनाही ते विचार पटतात, आवडतात. यामुळे वेदांतीला अनेक जिल्ह्यातून कार्यक्रमांची मागणी होत असते. मागील दोन वर्षांपासुन कोरोनामुळे यात खंड पडला आहे. आता परिस्थिती काहीशी निवळत असून लवकरच कार्यक्रमाद्वारे समाजप्रबोधन करण्यासाठी तयार आहे, असे वेदांतीने सांगितले.

"आतापर्यंत ७० ते ८० कीर्तनाचे कार्यक्रम केले आहेत. सध्या अकरावीला असून कला शाखेत शिकत आहे. गायन, वादन, किर्तनातच करिअर करायचे आहे. संत, समाजसुधारकांचे मानवहिताचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू शकते याचे खूप समाधान आहे."

- वेदांगी नारायण मुळेकर, बालकीर्तनकार, नागपूर

loading image
go to top