Sangli : विस्थापितांसाठी खास प्रस्ताव द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

Sangli : विस्थापितांसाठी खास प्रस्ताव द्या

इस्लामपूर : कासेगाव येथे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामात विस्थापित होणारी बहुतेक कुटुंबे भूमिहीन शेतमजूर व मागासवर्गीय आहेत. या कुटुंबांचे पूर्ण पुनर्वसन करण्यासाठी खास प्रस्ताव तयार करावा, अशी सूचना माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना केली. श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

राजारामनगर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरण कामात कासेगावमध्ये विस्थापित होणारी कुटुंबे व अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी जयंत पाटील, डॉ. पाटणकर यांनी कासेगाव येथील कामाची माहिती घेत अधिकारी व विस्थापित कुटुंबांशी सविस्तर चर्चा केली. प्रांताधिकारी संपतराव खिलारी, तहसीलदार प्रदीप उबाळे, नॅशनल हायवेचे मॅनेजर चंद्रकांत भरडे, विजय पाटील, भूसंपादन (सातारा) चे किरण चव्हाण, सरपंच किरण पाटील, कॉ. जयंत निकम, विश्वनाथ पाटसुते प्रामुख्याने उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, ‘‘ही कुटुंबे गेली चार-पाच पिढ्या या जागेवर राहत आहेत. त्यांच्या घरांचे मूल्यांकन करून त्यांना भरपाई द्यावी लागेल. तसेच जी कुटुंबे पूर्ण बेघर होत आहेत, त्यांना जागा घेऊन त्यांचे पूर्ण पुनर्वसन करावे लागेल. या कुटुंबांना त्रास होणार नाही, याची आपण काळजी घ्यावी.’’

डॉ. भारत पाटणकर म्हणाले, ‘‘संबंधित अधिकाऱ्यांनी पुनर्वसन कायद्याच्या अधिन राहून या कुटुंबांचे पूर्ण पुनर्वसन करण्यासाठी सकारात्मक भूमिका घ्यावी." चंद्रकांत भरडे यांनी वरिष्ठांशी चर्चा करून या विस्थापित कुटुंबांच्या संपूर्ण पुनर्वसनासाठी खास प्रस्ताव तयार करू, अशी ग्वाही दिली.

प्रारंभी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, सरपंच किरण पाटील, विश्वनाथ पाटसुते, कोंडिबा पाटसुते, हंबीर पाटसुते, बाळासो पाटसुते, गोरख पाटसुते यांनीही काही सूचना मांडल्या. उपसरपंच दाजी गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील, ग्रामसेवक राहुल सातपुते, तलाठी सुभाष पाटील, तसेच अमोल मिसाळ, बापूराव बडेकर, राजेंद्र पाटसुते, क्रांतिकुमार मिसाळ, नामदेव पाटसुते, अधिक मिसाळ, शहाजी मिसाळ, गणपती माने, सदानंद पाटसुते, रतन पाटसुते, प्रवीण बडेकर, निवास हेगडे, मल्लापा गेजगे, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते.

विस्थापित कुटुंबांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

दिवाळीच्या तोंडावर काही अधिकाऱ्यांनी या भागातील कामाची पाहणी करून काही दिवसांत घरे काढून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे ही विस्थापित होणारी कुटुंबे हवालदिल झाली होती. मात्र आमदार जयंत पाटील, डॉ. पाटणकर, देवराज पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतील सकारात्मक चर्चेने या कुटुंबांनी सुटकेचा निःश्वास सोडला.