
Kolhapur Digital Arrest Case : देवकर पाणंद येथील निवृत्त अधिकारी व सम्राटनगरातील निवृत्त प्राध्यापिकेस ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली भीती दाखवून सुमारे ११ कोटी रुपये हडप करणारी टोळी पुण्यातील असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी पुण्यातील एका हॉटेलच्या खोलीत न्यायालय व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचा सेटअप तयार करून ही रक्कम हडप केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. त्यांच्या बँक खात्यातून ४८ लाख रुपये गोठवण्यात आले आहेत. त्यांचा दोन्ही गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यांच्याकडून अन्य गुन्हे उघडण्याची शक्यता असल्याने त्यांची कसून चौकशी केली जात आहे.