esakal | चंदगड तालुक्‍यातील उसाला परतीच्या पावसाचा फटका
sakal

बोलून बातमी शोधा

Rain Damage To Sugarcane In Chandgad Taluka Kolhapur Marathi News

यावर्षी परतीच्या पावसाचा ऊस पिकाला फटका बसला. जोमात आलेले उसाचे पिक ऐनभरणीच्या वेळीच अतिवृष्टीमुळे जमिनीवर पडल्याने ऊस पिकाचे नुकसान झाले.

चंदगड तालुक्‍यातील उसाला परतीच्या पावसाचा फटका

sakal_logo
By
अशोक पाटील

कोवाड : यावर्षी परतीच्या पावसाचा ऊस पिकाला फटका बसला. जोमात आलेले उसाचे पिक ऐनभरणीच्या वेळीच अतिवृष्टीमुळे जमिनीवर पडल्याने ऊस पिकाचे नुकसान झाले. त्यामुळे उसाच्या एकरी उत्पादनावर परिणाम होणार असून शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

सप्टेंबर महिना संपत आला तरी यावर्षी पावसाने पाठ सोडली नाही. कमी सुर्यप्रकाश व पावसाची संततधार यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. चंदगड तालुक्‍यात ऊस हे उत्पन्न मिळवून देणारे हुकमी पिक आहे. तालुक्‍यात 10500 हेक्‍टर क्षेत्रात उसाची लागवड केली आहे, पण यावर्षी सततच्या पावसाचा मोठा फटका उसाला बसला आहे. उसाच्या वाढीसह भरणीवर परिणाम झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सततच्या पावसामुळे उसाच्या शेतीत पाणी तुंबून राहिल्याने पिकाची वाढ खुंटली आहे. पाण्याचा निचरा न झाल्याने उसाच्या मुळांची ताकद कमी होऊन ऊस जमिनीवर पडला आहे. यावर्षी दोन वेळा महापूर आल्याने नदीकाठचे ऊस पिक महापूरात बुडाले होते. पुराचे पाणी तात्काळ कमी झाल्याने त्यातून पिक सावरले, पण त्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने नदीकाठच्या ऊस पिकासह माळरानावरील उसानेही जमिनीवर लोळण घेतली आहे.

सप्टेंबर महिन्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगफुटीसदृश्‍य पाऊस झाला. पुन्हा पूर येतो का अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण पावसाची उघडझाप सुरू राहिल्याने पूराचा धोका टळला. पण पावसात जमिनीवर पडलेला ऊस उभे करण्यासाठी शेतकऱ्यांची धडपडत सुरू आहे. मात्र उसाच्या मुळांचाच आधार कमी झाल्याने शेतकऱ्यांचा हा प्रयत्नही यशस्वी होताना दिसत नाही. त्यामुळे यावर्षी ऊसाच्या एकरी उत्पादनावर परिणाम होऊन लाखो रुपयांचे नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

ऊसाची तोडणी लवकर करण्यासाठी प्रयत्न
यावर्षी वादळी पावसामुळे ऊस पिकाला फटका बसला. अनेक ठिकाणी ऊस जमिनीवर पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्‍यता असल्याने हेमरस साखर कारण्याकडून पडलेल्या ऊसाची तोडणी लवकर करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. 
- भरत कुंडल, बिझनेस हेड, हेमरस 

संपादन - सचिन चराटी

kolhapur

loading image
go to top