esakal | राजाराम बंधारा पाण्याखाली; दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

राजाराम बंधारा पाण्याखाली; दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

राजाराम बंधारा पाण्याखाली; दोन दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. आज दिवसभरही पावसाची संततधार कायम राहिली. त्यामुळे कसबा बावडा (Kasba Bavda) येथील राजाराम बंधारा (rajaram dam)आज चौथ्यांदा पाण्याखाली गेला.गगनबावडा तालुक्‍यात तब्बल २०५ मिमी. पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी ३.९ मिमी. पाऊस हातकणंगले तालुक्‍यात झाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने उद्या (मंगळवार) व बुधवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. (rajaram-dam-under-water-warning-of-heavy-rain-in-two-days-kolhapur-marathi-news)

पंधरा दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कसबा बावडा येथील राजाराम बंधारा दुपारी पुन्हा एकदा पाण्याखाली गेला आहे. राजाराम बंधाऱ्याजवळ पंचगंगा नदीची पातळी १९ फुटांपर्यंत होती.

शहरात पाणीच पाणी

शहरातील परीख पुलाखाली दुपारी झालेल्या जोरदार पावसाने वाहतुकीला अडथळा येईल एवढे पाणी वाहत होते. तर सासने मैदान रस्ता, दुधाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत राहिले.

गगनबावड्यात सर्वाधिक पाऊस

जिल्ह्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक २०५ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. हातकणंगले- ३.९ मिमी, शिरोळ- ४.५ मिमी, पन्हाळा- २०.८ मिमी, शाहूवाडी- १७.३ मिमी, राधानगरी -३३.१ मिमी, गगनबावडा- ११०.८ मिमी, करवीर- २१.७ मिमी, कागल- ९.६ मिमी, गडहिंग्लज- ८.७ मिमी, भुदरगड- ३१.५ मिमी, आजरा-१४.५ मिमी व चंदगड- १४.४ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

कोदे धरण भरले

गगनबावडा ः गगनबावडा तालुक्यात गेल्या २४ तासांत २०५ मि.मी. पाऊस झाला. लखमापूर व कोदे धरण पाणलोट क्षेत्रात अनुक्रमे १६५ व १६३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोदे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून ७४३ क्यूसेक पाणी विसर्ग सुरू आहे.

हेही वाचा- स्पर्धा परीक्षेचा मार्ग वेळीच बदलला; निर्माण केला ‘केकोबा’ नावाचा बॅण्ड

गडहिंग्लजला रिपरिप

गडहिंग्लज : गेल्या वीस दिवसांपासून गायब असलेल्या पावसाची गडहिंग्लज तालुक्यात रविवारी रात्रीपासून रिपरिप सुरू झाली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. जूनमधील पावसाने पिकांची उगवण व वाढ चांगली झाली होती. त्यानंतर सुमारे वीस दिवस पावसाने दडी मारली. त्यातच कडक उन्हाने माळरानातील पिके कोमेजू लागली होती. काही शेतकऱ्यांनी पिकांना जगवण्यासाठी तुषार सिंचनासह विविध पद्धतीने पाणी दिले. दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाला. हवेतील उष्मा कमी झाला. ढगाळ वातावरण कायम होते. रविवारी रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. अधूनमधून पावसाची मोठी सर कोसळत आहे. यामुळे शेतकऱ्यांत आनंद व्यक्त होत आहे.

तुळशीच्या पाणलोटात ६४ मिमी. पाऊस

धामोड : परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. कुरणेवाडी येथे पावसामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. तुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ६४ मि.मी. पाऊस झाला. सध्या तुळशी धरणातून नदीपात्रात ५० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जलाशयाची पाणीपातळी ६०५.६९ मी. आहे. भात रोप लागणी व नाचणा मांडणीत शेतकरी गुंतला आहे. येथे रात्रभर दमदार पावसाने सुरुवात झाल्याने कुरणेवाडी येथील वीजपुरवठा आठ तास खंडित झाला होता.

सरवडे परिसरात रोपलावणीची धांदल

सरवडे : भात रोपलावणीस धांदल उडाली आहे. पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर गंभीर परिणाम झाला. पावसाला प्रारंभ झाल्याने रोपलावणीची धांदल उडाली होती. डोंगरमाथा परिसरात चिखलगुठ्ठा सुरू झाला आहे. नाचणा मांडणीला सुरुवात झाली.

म्हाकवे परिसरात दमदार

म्हाकवे : बाचणी-बेलवळे तसेच म्हाकवे परिसरात दीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार सुरुवात केली. भाताची तूट अळी लावणे, रोप लागण, सोयाबीन, भुईमूग, भांगलण, खतांचा डोस देण्यात शेतकरी मग्न आहे. पावसाने ओढ धरल्याने काही शेतकऱ्यांनी उपसा पंपाद्वारे भाताला पाणी देण्यास सुरुवात केली होती. दूधगंगा, वेदगंगेच्या पातळीत वाढ होत आहे.

जिल्ह्यात मंगळवारी (ता. १३) व बुधवारी (ता. १४) अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी या दोन दिवशी शक्‍यतो प्रवास टाळला पाहिजे.

-प्रसाद संकपाळ, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, कोल्हापूर

loading image