Rajaram Sugar Factory Election : ‘राजाराम’साठी टोकाची ईर्ष्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajaram Sugar Factory Election heavy cop cover place for voting at rajaram sugar mill

Rajaram Sugar Factory Election : ‘राजाराम’साठी टोकाची ईर्ष्या

कोल्हापूर : डोक्यावर भगवे फेटे, पिवळ्या-पांढऱ्या टोप्या, गळ्यात आपापल्या पॅनेलचे मतदान चिन्हासह मफलर बांधून सकाळी सात ते मतदान संपेपर्यंत पायाला भिंगरी बांधून पळणाऱ्या कार्यकर्त्यांनी आज कडक उन्हालाही जुमानले नाही.

पॅनेलकडून मतदारांच्या वाहतुकीसाठी शेकडो ट्रव्हल्स आणि चारचाकी वाहने तैनात राहिली. त्यामुळे विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीला लाजवेल, अशाच प्रकारचे वातावरण आज कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या मतदान प्रक्रियेवेळी पहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी एक-एक मत मिळवण्यासाठी शेवटच्या मिनिटापर्यंतपर्यंत झुंज दिल्याने कारखान्याच्या सत्तेसाठी टोकाची ईर्षा पहायला मिळाली.

राजाराम कारखान्यासाठी सकाळी आठ वाजता मतदान प्रक्रिया सुरु झाली. तीव्र उन्हामुळे सकाळी पावणे आठपासूनच सर्वच मतदान केंद्रावर मतदारांनी गर्दी केली. मतदान केंद्रात जवेढे मतदार होते, त्याहून अधिक कार्यकर्ते आपआपल्या बुथवर मतदारांच्या स्वागतासाठी हात जोडून उभे राहिले.

केंद्रात येणारे प्रत्येक मतदान आपल्यालाच मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये मोठी चुरस दिसली. बूथमध्ये आपापल्या पॅनेलचे चिन्ह आणि नेत्याचा फोटो दिसेल. मतदानासाठी येणाऱ्या प्रत्येक मतदाराची पडताळणी झाली. एखादा नेता मतदान केंद्रावर आला त्यांचे कार्यकर्ते व त्यांच्या विरोधातील कार्यकर्ते घोषणा-प्रतिघोषणा दिल्याने वातावरण तणावपूर्ण होत राहिले. अशावेळी पोलिसांना हस्तक्षेप करुन वातावरण शांत करावे लागले.

शिये (ता. करवीर) येथे महाडिक-पाटील गटात इर्षेने मतदान झाले. यातच सकाळी सव्वा दहाच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक याच केंद्रावर आले. त्यानंतर महाडिक गटाच्या कार्यकर्त्यांनी महडिक यांच्या जोरदार घोषणा द्यायला सुरुवात केली. त्यानंतर विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनीही तेवढ्याच ताकदीने आमदार सतेज पाटील यांचा जयघोष करत कंडका पाडणारच, असे आव्हान दिले.

त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटाला शांत केले. निगवे, भुयेवाडी येथे मतदारांनी गर्दी केली होती. मात्र, या ठिकाणी शांततेत मतदान झाले. इचलकरंजी येथे नगरपालिका शाळा क्रमांक २ मध्येही दुपारी दोनपर्यंत १८२ पैकी १३५ मतदान झाले. तरीही याठिकाणी मतदान कमी आणि दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची गर्दीच प्रचंड दिसली. पट्टण कोडोली येथील मतदान केंद्रावर सकाळपासून गर्दी होती. दुपारनंतर शांत राहिले. गड-मुडशिंगी येथे माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या मतदारांनी डोक्याला भगवे फेटे बांधून मतदान केले. एकूणच कार्यकर्ते आणि मतदारांनीही टोकाची ईर्षा करत मतांची बेरीच करण्याचा प्रयत्न केला.

प्रत्येक मतदान केंद्रावर मृत सभासदांचे दाखले

राजाराम कारखान्याचे अनेक सभासद मयत आहेत. मयत सभासदांचे मतदान बोगस होऊ नये, यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून प्रत्येक मतदान केंद्रावर मयत सभासदांच्या मृत्यूचे दाखले दिले होते.

वडणगेत खेळीमेळीत मतदान

वडणगे (ता. करवीर) येथे सकाळी दोन्ही गटातील उमदेवार आणि कार्यकर्ते एकत्र येऊन हसत-खेळत मतदारांचे स्वागत करत राहिले. आमच्यात कोणतेही राग, ईर्षा नाही, असे म्हणत दोन्ही गटांतील उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी फोटो काढले.