Video - 'पंधरा वर्षे डोक्‍यावरून पाणी ओढतोय; जीव जायची वेळ, तरी पाणी मिळेना'

फुलेवाडी रिंगरोड येथील गगनगिरी पार्कातील नागरिकांच्या व्यथा
Video - 'पंधरा वर्षे डोक्‍यावरून पाणी ओढतोय; जीव जायची वेळ, तरी पाणी मिळेना'
Updated on

कोल्हापूर : पहाटे उठायचं, सर्वांनीच अंघोळ आटपायची, संपलेले पाणी पुन्हा भरण्यासाठी सर्वांनीच कळश्‍या, घागरी, बादल्या, गंज, पिंप, मिळतील ती भांडी उचलायची आणि सकाळी सात वाजताच खासगी विहिरीकडे धावायचं. पाण्यासाठी नंबर लावायचे. नंबर येईल तेव्हा पाण्याची भांडी भरायची. पुरुषांनी मोठे गंज, घागरी डोक्‍यावर घ्यायच्या. महिलांनी डोक्‍यावर एकावर एक हंडे ठेवायचे. लहान मुलेही पाणी भरायला मागे नाहीत. झेपेल तशी कळशी डोक्‍यावर, काखेत घेतात आणि घराच्या दिशेने येतात. अवघ्या पाच-दहा मिनिटांत पुन्हा ही भांडी रिकामी करून विहिरीवर हजर राहतात. पाण्यासाठी कमीत कमी पंचवीस आणि जास्तीत जास्त पन्नास खेपा घरदारच मारते.

रिकामी भांडी भरून झाली, कपडे धुवून झाले की उसंत न घेता महिला स्वयंपाकाला सुरवात करतात. पुरुष नोकरी, व्यवसायाची तर मुले शाळेला जाण्याची तयारी करतात. हा प्रसंग कोणत्या दुर्गम वाड्यावस्त्यांवरील नव्हे तर शहराचाच भाग असलेल्या बोंद्रेनगरपासून हाकेच्या अंतरावरील आहे. फुलेवाडी रिंगरोड येथील गगनगिरी पार्कातील कष्टकरी वर्गाची पाण्यासाठीची ही धावपळ दहा-पंधरा वर्षे सातत्याने सुरू आहे. जीव जायची वेळ आली तरी आम्हाला पाणी मिळेना, अशा उदिग्न भाव येथील नागरिक कळवळून व्यक्त करतात.

साऊ बोडेकर सांगतात, 'गेली पंधरा वर्षे डोक्‍यावरून पाणी ओढतोय. जवळपास पन्नास घागरी पाणी भरावे लागते. सकाळी सात ते नऊ या वेळेतच त्या विहिरीवर पाणी मिळत असल्यामुळे जेवणाला सुरवात करण्यापूर्वीच घरदार पाण्यासाठी बाहेर पडतो. जवळपास तीस चाळीस खेपा झाल्या की पाणी भरून होते. एवढं पाणी भरल्यामुळे थकवा तर येतोच पण कामपण होत नाही.' जवळपास पंचवीस फेऱ्या मारल्यानंतर बयाबाई बोडेकर धापा टाकातच सांगत होत्या, 'एवढी वर्षे पाणी भरून आता हात-पाय मोडायची वेळ आली. पाणी पिऊनच जगता येत नाही. पोटासाठी कामावर जायला लागतंय. एवढ्या खेपा मारल्यानंतर अंगात त्राण उरत नाहीत.

पाईपलाईन आली; पण पाणी नाही

गेल्यावर्षी येथील नागरिकांनी प्रत्येक कुटुंबामागे 31 हजारांची पट्टी काढून स्वतःच्या खर्चाने पाईपलाईन टाकली. प्रत्येकाच्या घरासमोर ही पाईपलाईन आहे. मात्र याला पाणी मात्र येत नाही. आमच्या कॉलनीच्या आजूबाजूच्या कॉलन्यांत महानगरपालिकेचे चोवीस तास पाणी पोहचले मात्र आमच्याच कॉलनीला पाणी देण्यात प्रशासनाला काय अडचण आहे, अशी भावना प्रकाश बोडेकर यांनी व्यक्त केली.

लहान मुलेही पाणी मोहिमेत

पहिली-दुसरीच्या वर्गात शिकणारी मुलेही शाळेला जाण्यापूर्वी आई-वडील, आजीसोबत छोट्या छोट्या कळशीने पाणी भरतात. आई वडिलांची दोन खेपा तर या मुलांची एक खेप. त्यातही ओझं वाटलं तर मध्येच ती कळशी ठेवायची. हात पुढे मागे करायचे पुन्हा उचलायची आणि घागर उचलून वाट तुडवायची, अशी वेळ या मुलांवरही येथील पाणी परिस्थितीमुळे आली आहे.

"सकाळपासून 30 खेपा पाण्यासाठी मारल्या. आता घागरीचं ओझं पेलवेना म्हणून वाटेतच घागरी उतरवल्यात. पाणी भरताना कंबर भरून येते, पाय दुखतात. पाठीच दुखणं वाढलंय. कितीतरी वेळा शासनाच्या अधिकाऱ्यांना भेटून सांगितलं. पट्टी काढून पैसे भरले पण काहीच उपयोग झाला नाही."

- भागू गावडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Dhananjay Mahadik on Delhi student protest
Massive Rain Tree Collapse in Kolhapur Rajarampuri
Almatti Dam latest water storage update
Hasan Mushrif Gokul Milk Union election announcement
Marathi News Esakal
www.esakal.com