esakal | शाही दसरा सोहळा आज ; सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण | Kolhapur
sakal

बोलून बातमी शोधा

शाही दसरा सोहळा आज ; सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण

शाही दसरा सोहळा आज ; सोहळ्याचे होणार थेट प्रक्षेपण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर : ऐतिहासिक दसरा चौकात उद्या (शुक्रवारी) सायंकाळी शाही दसरा सोहळा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सोहळ्यासाठी फक्त निमंत्रितांनाच प्रवेश आहे. गर्दी टाळण्यासाठी दसरा चौकाकडे येणारे चारही मार्ग बॅरिकेडस् लावून बंद केले जाणार असून वाहतूक मार्गातही बदल केले आहेत. सोहळ्याचे थेट प्रक्षेपण फेसबुक लाईव्हबरोबरच स्थानिक वाहिनीवरून होणार आहे. शहरात दहा ठिकाणी स्क्रिनवरून हा सोहळा अनुभवता येणार आहे.

परंपरेप्रमाणे सायंकाळी सहा वाजून नऊ मिनिटांनी दसरा चौकात शमीपूजन होईल. तत्पूर्वी श्री तुळजाभवानी, श्री अंबाबाई आणि गुरुमहाराज वाड्यातील पालख्या दसरा चौकात येतील. छत्रपती परिवाराचे येथे आगमन झाल्यानंतर शमीपूजन होऊन सोने लुटण्याचा पारंपरिक सोहळा होईल. दसरा चौकात सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे.

गर्दी न करण्याचे आवाहन

पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी आज दसरा चौक परिसराची पाहणी केली. गेल्या वर्षी कोरोना संकटामुळे शाही सोहळा जुना राजवाडा येथे मोजक्याच मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये झाला होता. यंदाचा सोहळा दसरा चौकात होणार असला तरी केवळ मोजक्याच निमंत्रितांना प्रवेश देण्यात येणार आहे. दसरा संयोजन समितीतर्फे निमंत्रकांना पासचे वाटप केले आहे. ते पाहूनच प्रवेश दिला जाणार आहे. कोरोना नियमांचे पालन करून बैठक व्यवस्थेचे नियोजन केले आहे. लोकांनी दसरा चौकात गर्दी करू नये, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी गृह पोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, निरीक्षक तानाजी सावंत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमोद जाधव, ‘सायबर’चे शशिराज पाटोळे, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे दत्तात्रय नाळे, शहर वाहतूक शाखेच्या स्नेहा गिरी आदी उपस्थित होते.

बावड्याचा दसराही होणार

गेल्यावर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळे न झालेला कसबा बावडा येथील पारंपरिक दसऱ्याचा सोहळा उद्या (ता. १५) येथील पॅव्हेलियन मैदानावर होत आहे. पोलिसपाटील राजकुमार पाटील यांच्या हस्ते शमीच्या पानांचे पूजन होईल. तत्पूर्वी गावातील हनुमान, बिरदेव, मंगेश्‍वर देवांच्या पालखीचे आगमन पॅव्हेलियन मैदानावर होणार आहे.

दसरा चौकाकडे येणारे मार्ग बंद

सोहळ्यासाठी दसरा चौकाकडे येणारे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहेत. सीपीआर चौक, शहर वाहतूक नियंत्रण शाखा, टायटन शोरुम, मुस्लिम बोर्डिंग येथे बॅरिकेडस् लावण्यात आली आहेत. येथे उभे राहून नागरिकांना सोहळा पाहता येईल.

loading image
go to top