कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांनी टिकवला उर्दूचा गोडवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Schools in Kolhapur district have preserved Urdu language education

कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांनी टिकवला उर्दूचा गोडवा

कोल्हापूर : उर्दू ही विविध भारतीय भाषांपैकी एक आहे. मात्र, आता ती व्यवहारात फारशी उपयोगात येत नाही. त्यामुळे ती फार कोणाला अवगत नाही. मात्र, जिल्ह्यातील उर्दू माध्यमातील शळांनी अजूनही ही उर्दू भाषा अभ्यासक्रमाच्या माध्यमातून का असे ना पण जपली आहे. या शाळांमधून उर्दू भाषेचा, त्यातील साहित्याचा अभ्यास केला जातो. या शाळांमध्ये उर्दू साहित्याच्या निमित्ताने अजूनही थोर कवी मिर्झा गालीब आठवला जातो.

करे बात तो हर लब्ज से खुशबू आये

ऐसी जुबा वही बोले जिसे उर्दू आये

उर्दू भाषेचा गोडवा सांगण्यासाठी या ओळी पुरेषा आहेत. ही भारतीय भाषा आपल्या साहित्यासाठी, शब्दातील गोडव्यासाठी आजही ओळखली जाते. एके काळी या भाषेला राजाश्रय होता. काळाच्या ओघात या भाषेचा वापर व्यवहारात कमी होऊ लागला.

असे असले तरी अजूनही जिल्ह्यात सुमारे ९७ शाळा या उर्दू माध्यमाच्या आहेत. त्यामध्ये सुमारे ११ हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. या शाळांमध्ये हिंदी आणि मराठी वगळता सर्व विषय उर्दूमध्ये शिकवले जातात. या शिवाय उर्दू हा स्वतंत्र विषय आहे.

या शाळांमध्ये उर्दू शिकवली जाते. या शाळेमध्ये सर्वसाधारण मुस्लिम विद्यार्थी आहेत. त्यांची मातृभाषा उर्दू नाही. जिल्ह्यात मुस्लिम कुटुंबात स्थानिक बोली भाषा बोलली जाते. तिला बागवानी भाषा असेही म्हणतात. त्यामुळे उर्दूचा सहवास

या विद्यार्थ्यांना केवळ शाळेतच मिळतो. या शाळांमध्ये उर्दू शिकवण्यासाठी स्वतंत्र शिक्षक आहेत. ते त्यांना उर्दू साहित्याचा परिचय करून देतात. मिर्झा गालीब, अल्लमा इकबाल, अहमद खान, फैज अशा अनेक ख्यातनाम साहित्यिकांचा परिचय या शाळांमधून करून दिला जातो. व्यवहारात जरी उर्दूचा फारसा वापर होत नसला तरी आजही या शाळांनी उर्दूचा गंध दरवळत ठेवला आहे.

उर्दू ही मूळ भारतीय भाषा आहे. शब्दसौंदर्य, साहित्य या दृष्टीने ही समृद्ध भाषा आहे. गझल, हम्द, रुबाई या मध्यमातून या भाषेतून भावना व्यक्त केल्या जातात. उर्दू भाषिक शाळेमुळे या भाषेचे सौंदर्य आणि महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचते. शायरीच्या माध्यमातून ही भाषा आजही उपयोगात आणली जाते.

- उमर जमादार, उर्दू शिक्षक

टॅग्स :KolhapureducationUrdu