Kolhapur News : शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 शेती उत्पन्न बाजार समिती
शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच

शेती उत्पन्न बाजार समितीच्या २९ कर्मचाऱ्यांची सेवा अधांतरीच

कोल्हापूर : शेती उत्पन्न बाजार समितीच्या मागील संचालकांच्या काळात २९ कर्मचाऱ्यांची भरती सहकार निबंधक कार्यालयाकडून झालेल्या चौकशीत नियमबाह्य असल्याचा ठपका ठेवला होता. त्यानंतर दोन वर्षे हे कर्मचारी सेवेत आहेत. यातून वर्षाला अंदाजे साठ लाखांच्या खर्चाचा वेतनाचा बोजा पडत आहे. तर अन्य कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात चालढकल होत आहे, यातून त्या कर्मचाऱ्याची सेवा अधांतरीच असल्याचे दिसत आहे.

समितीची वार्षिक उलाढाल सातशे ते आठशे कोटीच्या घरात आहे. सहकारी तत्त्वावर कामकाज चालते. मागील संचालक मंडळाच्या काळात अपवाद वगळता आठ संचालकांनी आपल्या विश्वासातील व नात्यातील व्यक्तींना बाजार समितीत नोकरी लावण्यासाठी धडपड केली. यात कनिष्‍ठ लिपिक, शिपाई, वॉचमन व मजूर अशा पदावर भरती झाली. नियमबाह्य भरती झाल्याची तक्रार मागील संचालक मंडळातील दोन संचालकांनी सहकार निबंधकांकडे केली होती. त्यानंतरच्या चौकशी भरती नियमबाह्य झाल्याचा ठपका चौकशी अहवालात होता. त्यानंतर आजपर्यंत भरती रद्द झालेली नाही. मागील संचालक मंडळाने राजीनामे दिले. त्यापाठोपाठ अशासकीय प्रशासक मंडळ येथे आले. त्यांच्या काळातही या २९ कर्मचाऱ्यांची सेवा कायम आहे.

२९ कर्मचाऱ्यांची नियुक्ती नियमबाह्य की नियमानुसार हा पेच कायम आहे. भरती नियमानुसार असेल तर त्यांची १६ महिन्यांची सेवा झाली त्यांना सेवेत कायम केलेले नाही, काही मोजके सदस्य या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करा असा आग्रह धरून आहेत तर काही सदस्यांनी मौन पाळले आहे, काही सदस्यांचा विरोध आहे. अंतिम निर्णय काय होणार याबाबत उत्सुकता आहे.

या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा विषय तूर्त अजेंड्यावर नाही

- जयवंत पाटील, सचिव