शिवशाही बस संप काळात गायब; प्रवाशांची होतेय गैरसोय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशाही बस संप काळात गायब; प्रवाशांची होतेय गैरसोय

शिवशाही बस संप काळात गायब; प्रवाशांची होतेय गैरसोय

sakal_logo
By
शिवाजी यादव

कोल्हापूर : प्रवाशांना आरामदायी सेवेसाठी एसटी महामंडळाच्या सेवेत शिवशाही बस खासगी ठेकेदारामार्फत आणल्या. जवळपास ५०० बस ठेकेदारांच्या आहेत. चालक-वाहकही त्यांचेच आहेत. या बस पर्याय असताना निम्म्याहून अधिक शिवशाही बस संपकाळात गायब आहेत. या बस सेवेत आणण्यासाठी एसटी प्रशासनाने प्रयत्न केले नाहीत.

महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. यामुळे प्रवाशांची कोंडी झाली आहे. खासगी वाहतूकदारांनी दामदुप्पट भावात वाहतूक सुरू केली आहे. याचा फटका प्रवाशांना बसतो आहे. चौदा दिवसांपासून ही स्थिती असूनही खासगी ठेकेदारांच्या शिवशाही बस वाहतुकीसाठी एसटी प्रशासनाने आणलेल्या नाहीत. किंबहुना त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न केल्याचे फारसे दिसत नाही.

हेही वाचा: समुद्रकिनारी रापणीत अडकलेल्या डॉल्फिनला जिवदान

खासगी ठेकेदारामार्फत घेतलेल्या ५०० शिवशाही एसटीच्या सेवेत आहेत. या बसचा चालक ठेकेदाराचा, एसटीचा वाहक, टोल एसटीच भरते. त्यासोबत प्रवाशी कमी असो वा अधिक रोज तीनशे किलोमीटर भाड्याचे पैसे एसटी महामंडळाला रोज खासगी ठेकेदाराला द्यावे लागतात. एवढे असूनही शिवशाही बस फक्त जास्त प्रवासी असलेल्या शहरांकडे वाहतूक करते तर एसटीच्या साध्या बस, निमआराम बस ग्रामीण भागात फेऱ्या करतात. यातून एसटीला मिळालेला महसुलातील काही वाटा शिवशाहीच्या ठेकेदारांना द्यावा लागतो.

असे महिन्याला जवळपास दीड कोटी एका जिल्ह्यातून खासगी ठेकेदाराला द्यावे लागतात. असे असताना संप काळातही प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रादेशिक परिवहन विभागाने खासगी वाहतूकदारांनाही प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली. याच वेळी एसटी महामंडळाकडे ठेका असलेल्या शिवशाही बस मात्र सेवेत नाहीत. यातून प्रवाशांना गैरसोय सोसावी लागत आहे.

कोल्हापुरात सहा बस

राज्यभरात २८० वर शिवशाही बस एसटीच्या सेवेत आहेत, यातील सहा बस कोल्हापुरात आहेत. सर्वाधिक बस पुणे, मुंबई मार्गावर वाहतूक करतात यात औरंगाबाद, नाशिक, नागपूर, लातूर, सोलापूर येथे प्रत्येकी, २० ते ४० बस ठेकेदारांच्या आहेत. या सर्व बस संपकाळात ठेकेदारांनी ताब्यात ठेवल्या आहेत.

मौनामागे दहशत कोणाची

संपकाळात ठेकेदारांच्या शिवशाही बसचा वापर का झाला नाही या विषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे प्रतिक्रिया मागितली असता त्यांनी मौन पाळले. राज्य पदाधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनीही भाष्य करणे टाळले. त्यामुळे कोणाछ्या दहशतीमुळे अधिकारी बोलत नाहीत, हा प्रश्‍न आहे.

loading image
go to top