Sindhutai Sapkal: अनाथांची माय आणि कोल्हापूरची घट्ट नाळ..! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai Sapkal

Sindhutai Sapkal: अनाथांची माय आणि कोल्हापूरची घट्ट नाळ..!

कोल्हापूर : अनाथांची माय, पद्मश्री सिंधुताई सपकाळ (Sindhutai Sapkal)आणि कोल्हापूरचे (Kolhapur)नाते अखेरपर्यंत जिव्हाळ्याचे राहिले. त्यांच्या निधनानंतर आज या साऱ्या स्मृतींना उजाळा मिळाला. व्याख्याने, निधी संकलन, प्रकट मुलाखत, पुरस्कार वितरण अशा विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने त्या सतत कोल्हापुरात येत.

येथील विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्टतर्फे त्यांना २००५ मध्ये माऊली आनंदी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ‘मी अनाथांची माय बनले, तुम्ही त्यांचे गणगोत व्हा’ असे आवाहन त्यांनी या वेळी केले होते.

हेही वाचा: सिंधुताई सपकाळ : मुलगी नको असल्याने आई-वडिलांनी ठेवले होते चिंदी नाव

त्यांच्या एकूणच जीवनावर आधारित ‘मी सिंधूताई सपकाळ’ हा चित्रपट जगभर गाजला. त्याची सुरुवातही कोल्हापुरातून झाली होती. २०१० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या अगोदर दोन वर्षे त्यांची येथील प्रसिद्ध दिग्दर्शक (कै.) चंद्रकांत जोशी यांच्याबरोबर बैठक झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन श्री. जोशी यांनी करावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, पुढे हा विषय मागे पडला. चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने त्या कोल्हापुरात आल्या होत्या आणि त्यांचा दिलखुलास संवाद रंगला होता.

२०१८ मध्ये कागलच्या राजे विक्रमसिंह घाटगे फाउंडेशन संचलित राजमाता जिजाऊ महिला संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी त्यांना प्रमुख निमंत्रित केले होते. अगदी अलीकडेच गेल्या फेब्रुवारीत न्यू पॉलिटेक्निकचा माजी विद्यार्थी रोहित घोडके यांचे सिंधूताई तथा माई यांनी कौतुक केले होते. रोहित यांनी माईंच्या कारला हडपसर मांजरी येथील बालनिकेतन या संस्थेत जाऊन टेफ्लॉन कोटिंग केले होते. त्यानंतर रोहित यांनी ‘मी भरून पावलो’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती.

शिवाजी पेठेशी ऋणानुबंध

अगदी प्रारंभीच्या काळात माजी महापौर भीकशेठ पाटील यांनी सिंधूताईंना पाठबळ दिले. १९८४-८५ पासून त्या पाटील यांच्या शिवाजी पेठेतील घरी येत. तेथूनच जिल्ह्यातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे नियोजन व्हायचे. कार्यक्रमानंतर झालेल्या निधी संकलनाची रक्कम पाटील यांच्या घरीच मोजली जायची, अशी आठवण धनंजय पाटील यांनी सांगितली.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KolhapurSindhutai Sapkal
loading image
go to top