esakal | Video - केसांवर भांडी अन्‌ गावोगावची भटकंती!

बोलून बातमी शोधा

Video - केसांवर भांडी अन्‌ गावोगावची भटकंती!
Video - केसांवर भांडी अन्‌ गावोगावची भटकंती!
sakal_logo
By
संदीप खांडेकर

कोल्हापूर : 'घरोघरी चालत फिरतोय, केस घेऊन भांडी विकतोय. दिवसभरात १० किलोमीटर चालतोय. दिवसभरात १०० रुपये मिळत्यात. काही दिवस चुलीवर केवळ डाळ व भातच शिजतोय. भाजी आणायला पैसा नाही. दिवसभरात १०० ग्रॅम केस मिळत्यात. किलोमागं दोन हजार रुपये मिळण्यासाठी दोन महिने थांबावं लागतंय. तेव्हा कुठं केस जमा हुत्यात आणि ते विकायला येत्यात. लॉकडाउनमुळं हलाखीची स्थिती आहे. हे कोणाला सांगून चालणार नाही. आलेला दिवस पुढं ढकलणं आपल्या हातात आहे,' असे यादवनगरातील शारदा प्रताप शिंदे सांगत होत्या.

शारदा शिंदे १५ वर्षांपासून भांडी विकण्याचे काम करतात. दुकानातून छोटी-मोठी भांडी खरेदी करायची. तीच खेडोपाडी जाऊन विकून नफा मिळविण्याचे त्यांचे गणित. वडाप अथवा एसटीने गावात जायचे. पंचक्रोशीत पायाला भिंगरी बांधून फिरायचे. हलसवडे, नेर्ली तामगाव, नागाव, कणेरी मठ, कोगील बुद्रुक परिसरात त्या फिरतात. यादवनगरात केसांवर भांडी विकणाऱ्या अन्य महिलाही आहेत आणि प्रत्येकीची कहाणी वेगळी आहे. भांडी विकायला गेले तर एखादे कुटुंब दारात उभे राहू देत नसल्याची खंतही त्या व्यक्त करतात.

राधाबाई शिंदे म्हणाल्या, "भांडी विकूनच आमचं पोट चालतं. मुलगा गाड्या सर्व्हिसिंगचे काम करतो. त्याचा कुटुंबाला हातभार लागतो. त्याचे काम महिनाभर बंद आहे. तो घरीच बसून आहे. घरात शिजवायचे काय? एक किलो तांदूळ, २० रुपयांचे तेल, कांदा, डाळ, मीठ आणून जेवण करावे लागते." सारिका माळी म्हणाल्या, "शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, उत्तरेश्वर पेठेत फिरून भांडी विकतोय. लॉकडाउन पुकारल्यापासून हातात पैसा नाही. शासनाकडे काय मागायचं तर ते मिळेलच, याचा भरवसा नाही. आम्ही भांडी विकणाऱ्या महिला असून, शिकलो नाहीत. मात्र, रोजचा दिवस कसा ढकलायचा हे आम्हाला कळतंय." यादवनगरातल्या कल्पना माळी, शेवंता जगताप, शारदा माळी, बनाबाई शिंदे, सुरेखा माळी गेले अनेक वर्षे भांडी विकण्याचे काम करतात. स्वस्त धान्य दुकान त्यांच्या जगण्याचा आधार असून, लॉकडाउनमध्ये सर्वांचेच काम थांबले आहे. बहुतांश महिला डवरी समाजातील भांडी विकणाऱ्या बहुतांश महिला डवरी समाजातील आहेत. पूर्वी घरातील पुरुष मंडळी पूजाअर्चा करायची.