मराठी मालिकांचे काय? राज्यभरातील मालिकांच्या शूटिंगचे प्रोजेक्‍ट निघाले परराज्यात

राज्यभरातील बहुतांश मालिकांच्या शूटिंगबाबत प्रॉडक्‍शन हाउसेसनी हालचाली केल्या सुरू
film
filmesakal

कोल्हापूर : कोरोनामुळे जाहीर संचारबंदीच्या काळात राज्य शासनाने सर्व प्रकारची शूटिंग बंद करण्याचा आदेश काढला. त्यामुळे आता बहुतांश सर्व प्रोजेक्‍ट रामोजी फिल्मसिटी, गोवा, भोपाळ आदी परराज्यांत जाऊ लागले आहेत. केवळ कोल्हापूरच नव्हे, तर राज्यभरातील बहुतांश मालिकांच्या शूटिंगबाबत प्रॉडक्‍शन हाउसेसनी याबाबत हालचाली सुरू केल्या आहेत.

गेल्या लॉकडाउनवेळी मुंबई, पुण्यातील सर्व प्रकारचे शूटिंग बंद झाल्याने कोल्हापुरात हे प्रोजेक्‍ट यावेत, यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले. त्याचा परिणाम म्हणून अनेक मोठी प्रॉडक्‍शन हाउस येथे शूटिंगसाठी येऊ लागली. त्याशिवाय राज्यभरातील विविध ठिकाणीही लगेचच शूटिंग सुरू करणे शक्‍य झाले. कोल्हापूर चित्रनगरीत आवश्‍यक सुविधा वाढवण्यात आल्या. त्यामुळे आणखी काही मोठ्या कंपन्या लवकरच येथे शूटिंगसाठी दाखल होणार होत्या. त्यासाठीच्या करारांबाबतची चर्चाही अंतिम टप्प्यात आली होती.

मात्र, पुन्हा संचारबंदी झाल्याने जी शूटिंग सुरू आहेत, ती सुद्धा परराज्यात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. केवळ कोल्हापूरच नव्हे, तर राज्यभरातील विविध ठिकाणी जी शूटिंग सुरू आहेत, तेथेही हीच परिस्थिती आहे.

दरम्यान, राज्यातील विविध ठिकाणी सुरू असलेली बहुतांश हिंदी शूटिंग परराज्यात निघाली आहेत. त्यामुळे हिंदी मालिका सुरळीत सुरू राहतील. मात्र, मराठी मालिकांसमोर अनेक अडचणी आहेत. या मालिका मध्येच बंद झाल्या, तर प्रेक्षक हिंदी मालिकांकडे वळेल आणि पुन्हा त्यांना मराठीकडे आणण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील, असाही एक सूर उमटू लागला आहे.

एका एपिसोडसाठी जादा तीन लाख...

काही हिंदी मालिकांसाठी अडीच ते तीन लाख रुपये प्रति एपिसोड जादा निर्मिती खर्च देण्याची तयारी प्रॉडक्‍शन हाउसेसनी दाखवली आहे. दुसरीकडे काही मराठी मालिकांसाठी पंचवीस ते तीस हजार जादा निर्मिती खर्च देऊन शूटिंग परराज्यात हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. एकदा या मालिका परराज्यात गेल्या की पुन्हा त्या राज्यात लवकर आणणे कठीण जाणार आहे. त्यामुळे एक-दोन दिवसांतच याबाबत सकारात्मक निर्णय होणे अपेक्षित आहे.

संचारबंदीपूर्वी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून कमीत कमी उपस्थितीत शूटिंग सुरू ठेवण्याचा निर्णय झाला होता; पण संचारबंदीच्या आदेशानुसार सर्व प्रकारची शूटिंग बंदच राहणार आहेत. 30 एप्रिलपर्यंत हीच परिस्थिती राहणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर शूटिंग सुरू व्हावीत, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

- सुबोध भावे, अभिनेता

कोल्हापूर आता पुन्हा शूटिंग डेस्टिनेशन म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. अनेक लोकेशन्सना चांगली मागणी आहे. कोरोनाच्या वाढत्या काळात आउटडोअर शूटिंग बंद राहतील; पण सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत इनडोअर शूटिंग करता येणे शक्‍य आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे.

- आनंद काळे, अभिनेता

कोल्हापूरचा पुढाकार

गेल्या लॉकडाउनवेळी शूटिंग लवकरात लवकर सुरू व्हावीत आणि कोल्हापुरात नवे प्रोजेक्‍ट आणून पर्यटन विकासासाठी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कलाकारांनी प्रयत्न केले. "सकाळ'नेही या भूमिकेला बळ दिले. आठ ते दहा नवीन प्रोजेक्‍ट आणि चित्रनगरीत दोन नवीन मालिका हे त्याचेच यश आहे. मात्र, आता नव्याने आलेले आणि आगामी प्रोजेक्‍ट पुन्हा इतर ठिकाणी जाणार नाहीत, यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागणार आहेत.

Edited By- Archana Banage

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com