esakal | जरबेऱ्याच्या शेतीतून दरवळला यशाचा सुगंध; अक्षयची लाखोंची उलाढाल
sakal

बोलून बातमी शोधा

जरबेऱ्याच्या शेतीतून दरवळला यशाचा सुगंध; 
अक्षयची लाखोंची उलाढाल

जरबेऱ्याच्या शेतीतून दरवळला यशाचा सुगंध; अक्षयची लाखोंची उलाढाल

sakal_logo
By
मतीन शेख

कोल्हापूर : घरात शेतीची सर्वांना आवड. त्याच्या मनातही शेतीबद्दल रुची निर्माण झाली. शाळेत हुशार असल्याने पोराने शिकावं, अशी सर्वांचीच इच्छा होती. त्याने बारावीनंतर शेती विषयात उच्चशिक्षण घेण्याचे ठरवले. ॲग्री बिझनेस मॅनेजमेंटमध्ये (agri business management) पदवी घेऊन अधिकारी होण्याचे पक्के केले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. विविध परीक्षा देऊनही यशाचा दुष्काळ संपेना. शेवटी त्याने कृषी खात्यात कंत्राटी तत्त्वावर प्रकल्प अधिकारी (project officer) म्हणून काम सुरू केले. तिथे पगारही कमी.

शेवटी त्याने आधुनिक शेती करण्याचा निर्णय घेतला आणि ग्रीन हाउसची (green house) उभारणी करत जरबेरा फुलांची शेती सुरू केली. ही यशोगाथा आहे इस्पुर्ली (ता. करवीर) येथील अक्षय शिवाजी पवार या तरुणाची. आज तो लाखोंची उलाढाल करत बेरोजगार तरुणांना आधुनिक शेतीकडे वळण्याची प्रेरणा देत आहे. अक्षयने २०१० ला पुण्यातून कृषी पदवीचे शिक्षण घेतले. यानंतर एम. पी. एस. सी.चा अभ्यास सुरू केला. कृषीसह तो एस. टी. आय. पी. एस. आय पदासाठी परीक्षा देत होता; पण यश मिळत नव्हते. फक्त अभ्यासच करत राहणे हे त्याला पटत नव्हते. अभ्यासाबरोबर ऑनफिल्ड काम करावे, या उद्देशाने तो कोल्हापूर जिल्हा कृषी विभागात कंत्राटी तत्त्वावर दाखल झाला.

हेही वाचा: रत्नागिरीत दोन दिवसांसाठी रेड अॅलर्ट; हवामान विभागाचा इशारा

भुदरगड (bhudargad) विभागात फलोत्पादन प्रकल्प अधिकारी म्हणून काम करू लागला. अभ्यास सुरूच होता. नोकरीची हमी नव्हती. पगारही तुटपुंजा. परीक्षेतल्या अपयशाने अधिकारी होण्याचं स्वप्न धुसर होत होतं. वयही वाढतच होतं. घरात अक्षयच्या लग्नाचा ठराव मांडला. पुढे नेमके काय करावे सुचत नव्हते. त्याने काजू प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी बँकेकडे अर्ज केला; पण कर्ज मिळत नव्हते. नंतर त्याने शेती आधुनिक करण्याचे नियोजन आखले. वडील, चुलत्यांनी पाठिंबा दिला. तीन वर्षांपूर्वी मित्र, नातेवाईकांकडून पैशाची जुळवाजुळव करून २५ लाख खर्च करत अक्षयने अर्ध्या एकरात ग्रीन हाउसची उभारणी केली. जरबेरा फुलांची शेती सुरू केली. पहिल्याच वर्षी १० लाखांचा निव्वळ नफा झाला. पुढे कलर कॅप्सिकम, जिप्सोफिलाचे पीक घेतले. यातूनही त्याला चांगले उत्पादन मिळाले. वर्षाला लाखोंची उलाढाल सुरू झाली. सध्या तो जिल्हा कृषी विभागात कंत्राटी टेक्निकल ऑफिसर म्हणूनही सेवा बजावत आहे.

शेतकऱ्यांना सेवा अन् प्रबोधनही...

स्पर्धा परीक्षेतील स्वप्ने अधुरी राहिलेल्या तरुणांना सोबत घेऊन इस्पुर्ली येथे अक्षयने अॅग्री मॉलची तसेच कृषी सेवा केंद्राची उभारणी केली आहे. या माध्यमातून तो शेतकऱ्यांना सेवा पुरवत आहे. बेरोजगार तरुणांना शेतीकडे वळण्याची प्रेरणा, तसेच सल्ला देत आहे. शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीचे प्रयोग करण्यासाठी प्रबोधन सत्रही चालवत आहे.

हेही वाचा: पृथ्वीचे आरोग्य समुद्रावर कसे अवलंबून? जाणून घ्या नेमकं कारण

"स्पर्धा परीक्षा हे क्षेत्र बेभरवशाचे आहे. बेरोजगारी वाढल्याने स्पर्धा वाढली आहे. तरुणांनी कमी कालावधीत झोकून देत अभ्यास करावा. यश मिळाले नाही, तर दुसरा पर्याय ठेवावा. शेतकऱ्यांच्या मुलांनी शेतीत प्रयोग करावेत."

- अक्षय पवार

loading image