esakal | व्यथा कुटुंबाच्या; मी रक्ताच्या नात्यातील सात माणसं गमावलेत
sakal

बोलून बातमी शोधा

व्यथा कुटुंबाच्या; मी रक्ताच्या नात्यातील सात माणसं गमावलेत

व्यथा कुटुंबाच्या; मी रक्ताच्या नात्यातील सात माणसं गमावलेत

sakal_logo
By
संभाजी गंडमाळे

कोल्हापूर : माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी सहा महिन्यांत रक्ताच्या नात्यातील सात माणसं गमावली आहेत. इतकी विदारक परिस्थिती आयुष्यात कधी अनुभवली नव्हती. अर्थचक्र चालूच राहिले पाहिजे. पण, गरज नसेल तर कशाला बाहेर पडता, काही दिवस नाही ताजी भाजी खाल्ली तर कुणी मरतं का, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत आप्पा पाटील तळमळीने सांगत असतात. जवळची आपली माणसं गेली, की त्यातून लवकर बाहेर पडणं फार अवघड असतं. मी तर या साऱ्या माणसांना दवाखान्यात नेण्यापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत साऱ्या गोष्टींचा साक्षीदार आहे, असे भावनिक होऊन सांगतानाच ‘‘प्रत्येकाने खबरदारी म्हणून स्वतः पहिले पाऊल टाका. आपली फॅमिली सुरक्षित ठेवा म्हणजे आपलं गाव सुरक्षित राहिल. विशेषतः तरुण भावांनो तुम्ही सुपरस्प्रेडर होऊ नका, असं कळकळीचं आवाहनही ते करतात.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत सप्टेंबरमध्ये पाटील यांच्या मामांच्या घरी कोरोनाचा शिरकाव झाला. मामा रवींद्र नेमिष्टे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. पाच रेमडेसिव्हिर इंजेक्शन देऊनही मामा वाचू शकले नाहीत. गरोदर असलेल्या त्यांच्या सुनेसह बाकीची मंडळी मात्र उपचारानंतर बरी झाली. दुसरी लाट आली आणि पुन्हा एका पाठोपाठ एक धक्के बसायला सुरवात झाली. येलूरची मावशी, काका आणि त्यांच्या घरातील एकूण सहा माणसांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. नऊ दिवसांत मावशी, काका आणि मावशीची चुलत जाऊ अशी तीन माणसं हे जग सोडून निघून गेली.

हेही वाचा: हलगर्जीपण करणाऱ्या हॉस्पिटलवर कारवाई

पाटील सांगतात, ‘‘मावशी-काकांच्या धक्क्यातून सावरत असतानाच अहमदाबादला नोकरीनिमित्त असणारी भाची, जावई आणि त्यांची साडेचार वर्षांची त्यांची मुलगी पॉझिटिव्ह आले. त्यांच्यावर उपचारासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली गेली. पण, २९ वर्षांची भाची ऋतुजा उपचारादरम्यान अगदी अनपेक्षितपणे गेली. आपल्या अंगाखांद्यावर खेळलेली पोर अशी डोळ्यांदेखत गेली. माणसाचं जगणं एवढं अनिश्चित झालयं का, तिचे उत्तरकार्य आणि इतर विधी होतात न होतात तोच दुसरे मामा आणि आज्जीने तीन दिवसांत जगाचा निरोप घेतला.’’

कुठे गेल्या सामाजिक जाणिवा?

एकमेकांना सहकार्याची, अडचणीच्या काळात धावून जाण्याची आपली संस्कृती. एखाद्या घरातील कुणी मृत झाले तर दहा-बारा दिवस आपण त्या कुटुंबाचे आधार बनतो. अगदी त्यांच्या जेवणापासून साऱ्या गोष्टींची जबाबदारी घेतो. पण, कोरोनाच्या या लाटेत आपल्या सामाजिक जाणिवाही मेल्याचा अनुभव घेतला. ज्या घरातील कुणी पॉझिटिव्ह आले. त्या घरांना जणू वाळीत टाकण्याचेच प्रकार घडले. हीच का आपली माणुसकी, असा सवालही पाटील उपस्थित करतात. केवळ प्रशासन आणि शासनावरच अवलंबून न राहता प्रत्येकाने कोरोना होऊच नये, यासाठी स्वतः कोरोनायोद्धा होऊ या. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूया, असे आवाहनही ते करतात.

हेही वाचा: खुशखबर! इंडियन आर्मीच्या 'Technical'मध्ये 189 पदांसाठी भरती; 'असा' भरा आजच अर्ज