हातकणंगले तालुक्यातील ऊस तोडी, ऊस वाहने रोखणार: जय शिवराय किसान संघटनेचा इशारा :Kolhapur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी माने

हातकणंगलेतील ऊस तोडी रोखणार : जय शिवराय किसान संघटनेचा इशारा

घुणकी (कोल्हापूर) : साखर आयुक्त पुणे यांनी कायद्यानुसार मोळी बांधणी एक टक्का करावी असे लेखी आदेश देऊनही त्याला कारखानदारांनी हरताळ फासला आहे. जिल्हाधिकारी राहूल रेखावर (Rahul Rekhavar) यांनी केलेल्या सूचनेप्रमाणे पूर बाधित ऊस ४० टक्के व चांगला ऊस ६० टक्के याप्रमाणे ऊस तोडी करण्याचे कारखानदारांना सांगितले असतानाही कारखानदारांनी आदेशाचे पालन केले नसल्याचे निषेधार्थ बुधवार (ता.१७) पासून जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने हातकणंगले तालुक्यातील सर्वच कारखान्यांच्या ऊस तोडी रोखणार व ऊस वाहतूकही बंद करणार असल्याचा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला आहे.

माने यांनी दिलेली माहिती अशी, कोल्हापूर जिल्ह्यातील दत्त साखर कारखाना शिरोळ, छत्रपती शाहू कारखाना कागल, सदाशिवराव मंडलिक साखर कारखाना हमिदवाडा व इको केन हे साखर कारखाने मशिनने तुटलेल्या उसाची एक टक्काच मोळी बांधणी घेत आहेत. मग इतर कारखानदारांना का जमत नाही ? याचा शेतकऱ्यांनीही विचार करावा. अन्य साखर कारखाने चार टक्के मोळी बांधणी घेतात. म्हणजेच शेतकऱ्यांची प्रति टनाला एकशे वीस रुपयाची लूट साखर कारखानदार करत आहेत. शिवाय कोरोनामुळे व महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. कारखानदार शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी नुकसानच करीत आहेत.

गेले महिनाभर जय शिवराय किसान संघटनेच्यावतीने कारखानदारांना मशीन तोडीतून तुटलेल्या ऊसाची मुळी बांधणी एक टक्का करावी, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ऊस तोडणी करावी म्हणून संघटना विनंती करीत आहे. जोपर्यंत साखर कारखानदार एक टक्का मोळी बांधणी आणि पूर बाधित ऊस ४० टक्के व चांगला ऊस ६० टक्के याप्रमाणे ऊस तोडणी होत नाही तोपर्यंत ऊस तोडणीसह वाहतूक रोखणार असल्याचा इशाराही अध्यक्ष शिवाजी माने यांनी दिला. यावेळी बंडा पाटील, सदाशिव कुलकर्णी, शिवाजी शिंदे, गब्बर पाटील, प्रताप चव्हाण, शितल कांबळे, दत्ता पाटील, भैरवनाथ मगदूम, राजाराम थोरवत, उत्तम माळी आदी उपस्थित होते.

loading image
go to top