esakal | विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी शिक्षकांची धावाधाव
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Are Busy Getting Certificates From Students Kolhapur Marathi News

दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी शोधमोहीम राबविली जाते. यंदा मागील वर्षाच्या समारोपालाच कोरोनाने हजेरी लावली. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्षही अडचणीत आले.

विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी शिक्षकांची धावाधाव

sakal_logo
By
अवधूत पाटील

गडहिंग्लज : दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांसाठी शोधमोहीम राबविली जाते. यंदा मागील वर्षाच्या समारोपालाच कोरोनाने हजेरी लावली. त्यामुळे नवे शैक्षणिक वर्षही अडचणीत आले. शासनाने यावर "शाळा बंद शिक्षण सुरू' असा पर्याय काढला. शाळांचे प्रत्यक्ष कामकाज केव्हा सुरू होईल हे अद्यापही निश्‍चित नाही. पण, संचमान्यतेसाठी 30 सप्टेंबरचा पट ग्राह्य मानला जातो. त्यामुळे शिक्षकांची विद्यार्थ्यांच्या दाखल्यासाठी धावाधाव सुरू आहे. कोरोना प्रादुर्भावातही गाठीभेटी घेतल्या जात असल्याचे चित्र आहे. 

शासनाने मधल्या काळात मागेल त्याला शाळा धोरण अवलंबले. त्यामुळे गावोगावी शाळा सुरू झाल्या. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर झाला. यातून विद्यार्थी मिळविण्यासाठी रस्सीखेच सुरू झाली. तुकड्या जास्त असलेल्या संस्थांमध्ये ती अधिकच आहे. दरवर्षी शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचा शोध सुरू होतो. अतिरिक्त ठरायचे नसेल तर विद्यार्थी जमा करणे अपरिहार्य ठरते. आपल्याच शाळेत प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या वर्गणीतून सवलतीही दिल्या जातात. एसटीचा पास, शालेय साहित्य, गणवेश आदींचा यामध्ये समावेश होतो. 

नव्या शैक्षणिक वर्षातही ही परिस्थिती कायम आहे. म्हणायला प्रशासकीय कामकाज सुरू आहे. तर विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मात्र, शाळेचे प्रत्यक्ष शैक्षणिक कामकाज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे जून महिन्यात प्रवेश निश्‍चित झालेले नाहीत. मागील वर्गातील विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून असल्या तरी तुकडी टिकविण्यासाठी लागणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रश्‍न कायम राहिला आहे. 

दरम्यान, दरवर्षी 30 सप्टेंबरच्या पटावर संचमान्यता होते. यावरच शिक्षकांचे भवितव्य अवलंबून असते. यंदा शासनाकडून संचमान्यतेबाबत निर्णय झालेला नाही. पण, शिक्षकांकडून खबरदारी घेतली जात आहे. निर्धारित मुदतीला चार-पाच दिवसच हाती राहिलेले असल्याने विद्यार्थ्यांचे दाखले जमा करण्यासाठी शिक्षकांकडून धावाधाव सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आहे पण, त्यातून गाठीभेटी घेतल्या जात आहेत. एकाच विद्यार्थ्याच्या घरी दोन-तीन शाळांचे शिक्षक हजेरी लावताना दिसत आहेत. शासनाने संचमान्यतेसाठी 30 सप्टेंबरचाच पट ग्राह्य धरला तर अडचण येऊ नये यासाठी शिक्षक धावपळ करताना दिसत आहेत. 

म्हणून सप्टेंबरपर्यंत रस्सीखेच... 
दरवर्षी जवळपास 90 ते 95 टक्के विद्यार्थ्यांचे प्रवेश जून महिन्यातच निश्‍चित होतात. पण, यंदा परिस्थिती वेगळी आहे. सर्वसाधारणपणे विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेल्या नव्या शाळेकडून पूर्वीच्या शाळेतील दाखल्यांची मागणी केली जाते. पण, यंदा शैक्षणिक कामकाज सुरू नसल्याने अडचण झाली आहे. त्यामुळेच जूनमध्ये जवळपास संपणारे काम सप्टेंबर संपेपर्यंत लांबले आहे. 

संंपादन - सचिन चराटी

loading image
go to top