Kolhapur : भाजपतर्फे अमल निश्चित ; पुन्हा महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी खडाखडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजपतर्फे अमल निश्चित ; पुन्हा महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी खडाखडी

भाजपतर्फे अमल निश्चित ; पुन्हा महाडिक विरुद्ध सतेज पाटील अशी खडाखडी

कोल्‍हापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी आज भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार अमल महाडिक यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध माजी आमदार महाडिक असाच सामना रंगणार आहे. भाजपकडून महाडिक परिवारातील उमेदवार लढणार, हे निवडणुकीची घोषणा झाल्यावरच निश्‍चित होते. याबाबत आठ दिवस महाडिक परिवारातून कोण निवडणूक लढणार, याबाबत खल सुरू होता. अगदी काही मतदारांबरोबरही चर्चा करण्यात आली. यातूनच अमल यांच्या नावावर भाजपने शिक्‍कामोर्तब केले. उमेदवारी निश्‍चितीनंतर आता मतदारांच्या जोडण्यांचे काम जोमाने सुरू झाले आहे.

विधान परिषद निवडणुकीची घोषणा ९ नोव्‍हेंबरला झाली. यानंतर लगेचच महाविकास आघाडीचे उमेदवार म्‍हणून पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रचारास सुरुवात केली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र येऊन प्रचाराच्या नियोजनासाठी बैठकही घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह जनसुराज्यचे नेते आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, माजी आमदार अमल महाडिक यांनी उमेदवारीबाबत चर्चा केली. यावेळी उमेदवार म्‍हणून सुरेश हाळवणकर, जिल्‍हा परिषद सदस्य राहुल आवाडे, प्रा. जयंत पाटील आदी नावांवर चर्चा झाली. चर्चेतून जिल्‍हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांचे नाव पुढे आले. दरम्यान, उमेदवारीवरून भाजपमध्ये बरीच खलबते झाली. जिल्‍हा परिषद सदस्य, पालिकांचे नगरसेवक व भाजपच्या मित्र पक्षांचे नेते यांची मते आजमावून घेण्यात आली. यानंतर उमेदवारीसाठी अमल महाडिक यांचे नाव पुढे आले.

मुंबईत सोमवारी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. बैठकीस विरोधी पक्षनेते, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासह नेते उपस्‍थित होते. यावेळी कोल्‍हापूर विधान परिषदेच्या जागेबाबत चर्चा करण्यात आली. यामध्ये अमल महाडिक यांच्या एकमेव नावावर चर्चा होऊन ते अंतिम शिक्‍कामोर्तब करण्यासाठी दिल्‍लीला पाठवण्यात आले. दोन दिवसांत भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डाकडून या नावाची घोषणा होण्याची शक्‍यता आहे. उमेदवारीसाठी नाव अंतिम असल्याने महाडिक कुटुंबाने मतदारांच्या गाठीभेटीवर जोर ठेवला आहे.

माजी आमदार अमल महाडिक यांनी २०१४ मध्ये तत्‍कालीन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात कोल्‍हापूर दक्षिणमधून निवडणूक लढवली. अवघ्या २२ दिवसांमध्ये प्रचार करून त्यांनी मंत्री पाटील यांचा पराभव केला होता. दरम्यान, २०१९ च्या निवडणुकीत अमल महाडिक यांना मंत्री पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील यांच्याकडून पराभवाला सामोरे जावे लागले. नुकत्याच झालेल्या गोकुळच्या निवडणुकीतही महाडिक यांच्या पॅनेलचा पराभव झाला. या सर्व पराभवांचे विधान परिषद निवडणुकीत उट्टे काढण्यासाठी महाडिक परिवार सरसावला आहे. यातूनच अमल महाडिक यांना विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्याचे निश्‍चित करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

loading image
go to top