
‘इचलकरंजीसह परिसरात नव्याने उभारण्यात येणारे तीन अत्याधुनिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) पूर्ण क्षमतेने चालविले जातील. त्यामुळे उद्योग क्षेत्रातून होणाऱ्या पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न कायमचा मार्गी लागेल’, असा विश्वास आमदार राहुल आवाडे यांनी व्यक्त केला.
इचलकरंजी शहर, लक्ष्मी आणि पार्वती औद्योगिक वसाहत या ठिकाणी नवीन अत्याधुनिक सामूहिक औद्योगिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (सीईटीपी) उभारण्यात येणार आहेत. या संदर्भातील ५२९ कोटींच्या सविस्तर प्रकल्प अहवालास ३० सप्टेंबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. प्रकल्प उभारणीसाठी शासनाच्या वस्त्रोद्योग व पर्यावरण विभागाकडून प्रत्येकी २५ आणि उद्योग विभागाकडून ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.