
राधानगरी अभयारण्यात वाघाचे दर्शन
कोल्हापूर - राधानगरी अभयारण्यात पट्टेरी वाघाचे दर्शन आज झाले. वन विभागाने राधानगरीसह दाजीपूर अभयारण्यात लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात पूर्ण वाढ झालेल्या या पट्टेरी वाघाची छबी कैद झाली. वन विभागानेच ही माहिती छायाचित्रासह आज दिली. जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून पालकमंत्री सतेज पाटील यांनी वन्यजीव निरीक्षणसाठी ट्रॅप कॅमेरा खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला होता. या निधीतून १०० ट्रॅप कॅमेरे खरेदी करण्यात आले होते. हा ट्रॅप कॅमेरा राधानगरी, दाजीपूर जंगलात लावण्यात आला असून, २५ दिवस वन्य जीवन निरीक्षणाची कार्यवाही प्रगतिपथावर आहे. ११ एप्रिलला सर्व वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन जंगलात मोक्याच्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. यापूर्वी २०१९ मध्ये एकदा वाघाचे छायाचित्रण झाले होते; परंतु त्यानंतर वाघाचे छायाचित्रण झाले नाही. वनाचे संरक्षण, कुरण विकास, प्रशिक्षित आणि सतर्क वन कर्मचारी, वणव्याचे घटलेले प्रमाण या सर्व बाबींमुळे राधानगरीचा अधिवास वाघासाठी पूरक झाल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा नियोजन समितीतून मोठ्या प्रमाणात ट्रॅप कॅमेऱ्यासाठी निधी मिळाल्याने या वाघाचे अस्तित्व मिळाल्याने वन्यजीवप्रेमी पालकमंत्र्यांचे अभिनंदन करीत आहेत. जिल्ह्याचे मानद वन्यजीव रक्षक अनिरुद्ध माने यांनी पालकमंत्र्यांच्या पुढाकारामुळे ही बाब शक्य झाली, असे नमूद केले. वाघाच्या अंगावर असलेले पट्टे हे विशिष्ट असतात व त्यामुळे वाघा-वाघांमधील फरक शास्त्रीय पद्धतीने ओळखता येतो. राधानगरी वाघाचे पट्टे सॉफ्टवेअरवर टाकून कर्नाटक व गोवा या राज्यातील वाघांशी मॅच करण्याचा प्रयत्न केला जाईल. जर ते मॅच झाले तर हा वाघ स्थलांतरित होऊन आलेला आहे, असे निष्कर्ष काढण्यात येतील. ते पट्टे मॅच झाले नाहीत तर या वाघाची उत्पत्ती राधानगरी अभयारण्यातच झाली, असा निष्कर्ष काढण्यात येईल. प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी विभागीय वन अधिकारी विशाल माळी यांना अधिक सतर्क राहून जास्त निरीक्षण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Web Title: Tiger Appear At Radhanagari Sanctuary
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..