esakal | झेंडूची फुले फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ
sakal

बोलून बातमी शोधा

Time To Throw Away The Marigold Flowers Kolhapur Marathi News

गेल्या वर्षभरामध्ये यावर्षी फक्त दसरा आणि दिवाळीमध्ये झेंडू फुलाला दर मिळाला आहे.

झेंडूची फुले फेकून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

sakal_logo
By
युवराज पाटील

दानोळी : गेल्या वर्षभरामध्ये यावर्षी फक्त दसरा आणि दिवाळीमध्ये झेंडू फुलाला दर मिळाला आहे. त्याच्या पूर्वी आणि आताही दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना फुले फेकून देण्याची वेळ आली आहे. दसरा आणि दिवाळीत झेंडू फुलाने भाव खाल्ला होता.

लक्ष्मीपूजनच्या पहिल्या दिवशी 130 रुपयांपासून 200 रुपयांपर्यंत दर मिळाला. लक्ष्मीपूजनादिवशी 50 रुपयांपर्यंत दर खाली आला. सण सरला आणि दर पण घसरला अशी परिस्थिती झाली असून, किलोला 10 रुपयांपेक्षा कमी दर मिळत आहे. या दराने पाठवणीचा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांना भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी फुले फेकून देत आहेत. 

वर्षभरामध्ये झेंडू फुलांना दर मिळाला नाही. शेतकऱ्यांनी कवडीमोल दरामध्ये फुले विकली आहेत. दसरा आणि दिवाळीत चांगला दराच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी फुले लावली, मात्र वाढीव दर फक्त एकच दिवस मिळाला. त्यानंतर फुलांना बाजारपेठेत ग्राहकच नसल्याने 10 रुपयांपेक्षा कमी दराने फुले विकली जात आहेत. मुंबई हे फुलांची हक्काची बाजारपेठ आहे. 

दहा रुपयाने दर मिळाला तर एका बकेटमध्ये 12 किलोप्रमाणे 120 रुपये होतात. मुंबईला पाठविण्याचा खर्च 85 रुपये व 15 रुपये कमिशन असे 100 रुपये खर्च होतात. शेतकऱ्यांच्या हातात बकेटमागे फक्त वीस रुपये मिळतात. दर कमी राहिल्यास तेही मिळत नाहीत, उलट भाडे अंगावर बसते आणि तोडणीचा खर्च वेगळाच. फुले न तोडता झाडांना तसेच ठेवल्यास डागी रोग येउन फुले व झाडे खराब होतात. त्यामुळे वेळच्यावेळी फुले तोडावीच लागतात. त्यामुळे शेतकरी मजुरांच्या पगारांचा भुर्दंड सोसून फुले तोडून शेताबाहेर टाकत आहेत. काही शेतकरी मेंढरे चरवित आहेत. 

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
गेल्यावर्षीपासून फुलाला दर मिळत नाही. दिवाळी व दसऱ्यात एक दिवस दर मिळाला. ग्राहकच नसल्याने आता पुन्हा दर कमी झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. 
- भरतेश खवाटे, शेतकरी फूल उत्पादक संघ 

मजुरांचा पगार अंगावर
सणात दर मिळेल, या अपेक्षेने फुले केली आहेत. एकच दिवस चढ्या दराने फुले विकली. आता पुन्हा दर कमी झाला आहे. पाठवलेल्या फुलांची पट्टी सगळी खर्चातच जात आहे. तोडणी मजुरांचा पगार अंगावर बसत आहे. त्यामुळे फुले तोडून टाकत आहोत. 
- संदीप चौगुले, फूल उत्पादक शेतकरी 

संपादन - सचिन चराटी

loading image