पन्हाळा येथील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू

पन्हाळा येथील सोमेश्वर तलावात बुडून एकाचा मृत्यू

Published on

पन्हाळ्यावर सोमेश्‍वर तलावात
नेबापूरच्या एकाचा बुडून मृत्यू
आपटी ः पन्हाळा येथील सोमेश्‍वर तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी घडली. घटनेची वर्दी पालिका मुकादम जयवंत कांबळे याने पन्हाळा पोलिसांत दिली. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पंचनामा केला. तलावाच्या काठावर मृत व्यक्तीचे चप्पल व मोबाईल सापडला. त्या आधारे नातेवाईकांचा शोध घेतला असता मृत व्यक्ती नेबापूर येथील शामराव हरी मोरे (वय ५५) असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. तपास पन्हाळा पोलिस निरीक्षक अरविंद काळे, धरमेश ठाणेकर, बाजीराव चौगले, विलास जादुवर, मारुती पाटील आदी करत आहेत.

सिद्धनेर्लीतील चोरी भावजयीकडून
कागल : सिद्धनेर्ली (ता. कागल) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्याने दागिन्यांसह रोकडवर डल्ला मारल्याची घटना घडली होती. दरम्यान भावजयीनेच हात साफ केल्याचे तपासात उघड झाले. संशयित महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून चोरीतील मुद्देमाल हस्तगत केला. याबाबतची फिर्याद कृष्णात आगळे यांनी दिली होती. आगळे यांची भावजय पूजा नवनाथ आगळे (वय ३२) हिला संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीत तिने चोरीची कबुली देत चोरीचा मुद्देमाल परत केला. पोलिस निरीक्षक अजितकुमार जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक वाकचौरे, पोलिस उपनिरीक्षक रविकांत गच्चे, सहाय्यक पोलिस हवलदार विजय पाटील, हेड कॉन्स्टेबल रणजित कांबळे यांनी चोरीच्या प्रकरणाचा तपास केला.

02462
हातकणंगलेत पादचाऱ्याचा मृत्यू
हातकणंगले ः अनोळखी वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. कमलाकर जगन्नाथ शेटके (वय ५५) असे त्यांचे नाव असून अपघात आज दुपारी येथील वीजवितरण कार्यालयासमोर झाला. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिसांत झाली असून अनंतकुमार जानवेकर यांनी वर्दी दिली आहे. मृत कमलाकर शेटके व्यवसायाने टेलर आहेत. दुपारच्या सुमारास ते पेठ्यावरून घराकडे येत असताना वीजवितरण कार्यालयाजवळ त्यांना वाहनाने मागून ठोकर दिली. यामध्ये ते रस्त्यावर आपटले. त्यांच्या दोन्ही पायांवरून चाक गेल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली होती. अतिरक्तस्त्रावाने त्यांचा जागीच मृत्यु झाला.

खोचीत ५२ हजारांची चोरी
खोची ः खोचीपैकी साखरवाडी येथे दिवसाढवळ्या घराची कडी कोयंडा उचकटून चोरट्याने जवळपास ५२ हजारांचे सोन्याचे दागिने व रोकड चोरून नेली. सारिका दयानंद कांबळे यांनी पेठवडगाव पोलिसांत फिर्याद दिली. शरद कारखाना रोडवर असणाऱ्या साखरवाडीत हा प्रकार गुरुवारी सकाळी आठ ते दुपारी एकच्या दरम्यान घडला. संबंधित घरातील व्यक्ती शेतकामासाठी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्याने घराचा कडी कोयंडा उचकटून वीस हजारांची सोन्याची बोरमाळ, तीस हजारांचे सोन्याचे टॉप्स व वेल व रोकड अडीच हजार रुपये असा ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भीमगोंडा पाटील करीत आहेत.

शिरढोणच्या सावकारावर गुन्हा
जयसिंगपूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील सागर राजू हेरवाडे याने येथील शिवाप्पा पायाप्पा पोलिसपाटील यांना ७ टक्के व्याजाने २ लाख ५० हजार दिले होते. पोलिसपाटील यांनी २ लाख ३२ हजार रुपये देऊनही पोलिसपाटील यांची चारचाकी व त्याचे आरसीबुक गहाण ठेवून आणखी ७ टक्के व्याज दिले नाहीस तर तुला सोडणार नाही, असे म्हणून घरात शिरून धमकी दिल्याप्रकरणी हेरवाडे याच्याविरोधात जयसिंगपूर पोलिसांत गुन्हा दाखल केला. ही घटना १७ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंतच्या मुदतीत घडली आहे. तपास जयसिंगपूर पोलिस करीत आहेत.

इचलकरंजीत एकावर विनयभंगाचा गुन्हा
इचलकरंजी : महिलेचा पाठलाग करून विनयभंग करण्यासह धमकी दिल्याप्रकरणी गावभाग पोलिसांत एकावर गुन्हा दाखल झाला. प्रफुल्ल पाटील (आंबे गल्ली, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. पीडित महिला व संशयित एकाच भागात राहतात. आज गुरुवारी पीडित महिला कामावर निघाली असताना संशयिताने मोटारसायकलवरून तिचा पाठलाग करत सुंदरबाग परिसरात रस्त्यावर अडवून तू मला फोन का करत नाहीस यासह अश्‍लील शब्द वापरत विनयभंग केला. हा प्रकार घरात सांगितल्याने पीडितेच्या घरासमोर जाऊन दंगा करत आता तुला सोडणार नाही, अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून प्रफुल्ल पाटील याच्यावर गुन्हा दाखल केला.


इचलकरंजीत एकावर गुन्हा
इचलकरंजी : विनापरवाना फलक लावल्याप्रकरणी गावभाग पोलिसांत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षावर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजित आनंदा रवंदे (वखारभाग) असे त्याचे नाव आहे. बुधवारी (ता. २०) शहरात परिवार संवाद मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे मंत्री व अन्य पदाधिकारी आले होते. स्वागतासाठी महात्मा गांधी पुतळा परिसरातील बालाजी बेकरीसमोर जयंत पाटील यांचे कटाऊट लावले होते. याप्रकरणी गावभाग पोलिसात अभिजित रवंदे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस रामा पाटील यांनी फिर्याद दिली.

१६०३
डोणोलीतील विद्यार्थ्याची आत्महत्या
बांबवडे ः दहावीचा पेपर अवघड गेल्याच्या नैराश्‍यातून डोणोली (ता. शाहूवाडी) येथील विश्वजित अशोक कांबळे (वय १७) याने एका पडक्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याची फिर्याद भाऊ महेश अशोक कांबळे याने शाहूवाडी पोलिसांत दिली. विश्वजितने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. त्याला पेपर अवघड गेले होते. यातून आलेल्या नैराश्यातून त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com