
लालपरी सहा महिन्यांनंतर मुक्कामाला!
गडहिंग्लज : तब्बल सहा महिन्यांनंतर लालपरी ग्रामीण भागात मुक्कामाला पोहोचली. एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटल्याने येथील आगारातील बहुतांश फेऱ्या सुरळीत झाल्या आहेत. परिणामी, ग्रामीण भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. तसेच या ठिकाणी रोज शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांची वडापच्या आर्थिक भुर्दंडातून सुटका झाल्याने पालकांनी सुस्कारा सोडला आहे. येथील आगाराला गेल्या दोन दिवसात रोज सरासरी पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.
शासनात विलीनीकरणाच्या मुख्य मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा आक्टोबरपासून संप सुरू होता. त्यामुळे लालपरीची सेवा ठप्प होती. गेल्या दोन महिन्यापूर्वी सुमारे ३० टक्के कर्मचारी कामावर हजर झाल्याने कोल्हापूर, संकेश्वर, पुणे, आजरा या मार्गावरील काही फेऱ्या सुरू झाल्या होत्या. पण, सर्वाधिक आवश्यकता असणाऱ्या ग्रामीण भागातील फेऱ्या ठप्प राहिल्याने त्या प्रवाशांची मोठी कुचबंणा झाली. एसटीच्या फेऱ्या नसल्याने विद्यार्थ्यांना वडापला आर्थिक भुर्दंड सोसून यावे लागत होते. महिन्याचे एसटी पासचे पैसे आठवड्याला खर्चावे लागले.
सोमवारी (ता. १८) उर्वरित एसटीचे कर्मचारी हजर झाले. त्यामुळे बहूतांशी मार्गावरील फेऱ्या पूर्ववत झाल्या.
आगाराच्या एकूण ३० मुक्कामाच्या फेऱ्या असून त्यापैकी २५ सुरू झाल्याचे आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी सांगितले. या आगाराला सर्वाधिक उत्पन्न देणारा कोल्हापूर मार्गावर १२, संकेश्वर ६, गारगोटी, आजरा व नेसरी ३, पुणे ५ अशा गाड्या धावत आहेत. सोलापूर, पंढरपूरसह तालुक्यातील सर्वच ग्रामीण भागात एसटी सुरू झाली आहे. आगाराकडे ६० बस असून १२९ वाहक, १४८ चालक तर कारागीर ६६ आहेत. सध्या दररोज पाच लाखांचे उत्पन्न मिळत आहे.
नाँन स्टॉप कोल्हापूरची मागणी
कोल्हापूर जिल्ह्यात नॉन स्टॉपचा पॅटर्न सुरू करणारी कोल्हापूर नॉन स्टॉप फेरी प्रवाशांत कमालीची लोकप्रिय आहे. ‘वाट पाहिन..पण नॉन स्टॉपनेच जाईन’ अशीच प्रवाशांची मानसिकता आहे. वेळेची बचत हे त्यामागील प्रमुख कारण आहे. गेल्या दशकभरापासून सुरू असणारी फेरी कोरोना, संप यामुळे विस्कळीत झाली होती. ती पूर्वतत सुरू करावी अशी प्रवाशांची मागणी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..