
हसन मुश्रीफ : जकारणातील किमयागार
जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात आपले अढळ स्थान निर्माण करणारे किमयागार नेतृत्व म्हणजे लोकप्रिय नेते नामदार हसन मुश्रीफ होय. राजकारणात आपले वेगळे अस्तित्व निर्माण करणारे, कागल तालुक्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणणारे राज्याचे ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होत आहे. जनतेचे कल्याण डोळ्यांसमोर ठेवून केलेले कार्य वेगळेच समाधान देऊन जाते. जनतेच्या समस्यांचे निवारण केल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू व मिळणारा आनंद जीवनातील कोणत्याही आनंदापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे. अशा विचाराने कार्य करणारे मंत्री मुश्रीफ गोरगरीब, सर्वसामान्य जनतेचे आधारवडच आहेत.
- सुभाष भोसले, सरपंच, पिराचीवाडी (ता. कागल)
राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रांत वावरत असताना अनेक गोष्टींचे भान ठेवावे लागते. हजारो लोकांचा संपर्क, समस्यांची नेमकी जाण, त्यावर नेमका उपाय आणि त्यासाठी पाठपुरावा करावा लागतो. लोकांना नेमके काय हवे आहे हे शोधण्याची दृष्टी लागते आणि आपल्या जनतेला जे हवे आहे ते मिळवून देण्यासाठी झपाटा आणि धडाका असावा लागतो. राज्याच्या राजकारणात अशी व्यक्ती शोधायची म्हटले तर त्यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव सर्वप्रथम असेल.
नामदार मुश्रीफ म्हणजे जनतेच्या सेवेसाठी कधीही न थकणारे नेते आहेत. विधानसभेला पहिल्यांदा पराभूत झाल्यावर हार न मानता जिद्दीने पुढील प्रत्येक निवडणूक ते जिंकत गेले. अफाट कार्यक्षमता, गोरगरीब, वंचित कष्टकरी, निराधार यांच्याविषयीची करुणा तसेच गट न पाहता अहोरात्र कष्ट घेण्याची मानसिकता यामुळे सलग पाच विधानसभेच्या निवडणुकीत ते विजयी झाले.
नामदार मुश्रीफ यांच्या रूपाने कागल मतदारसंघाला सदैव कार्यरत असणारा कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी लाभला. तसेच इथल्या जनतेनेही कोणताही भेदभाव न ठेवता नामदार मुश्रीफ यांना त्यांच्या सेवेचे पुण्य त्यांच्या पदरात टाकले. त्यांनी केलेल्या कामामुळेच जनतेच्या सिंहासनावरील ते खरेखुरे राजे आहेत.
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री म्हणून सूत्रे हाती घेतल्यावर त्यांनी जनहिताचे निर्णय घेण्याचा धडाका लावला. राज्यातील जिल्हा परिषदा व पंचायत समित्या यांना इमारत बांधकामासाठी सहायक अनुदाने घोषित केली. तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम राबविले. पंधराव्या वित्त आयोगाचा निधी वितरीत केला. स्मार्ट ग्राम योजना राबविली. स्मार्ट ग्राम योजनेची बक्षीस रक्कम दुप्पट करून या योजनेस स्वर्गीय आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम योजना असे नाव देऊन आबांच्या प्रती कृतज्ञता जपली. या योजनेमुळे राज्यातील खेडेगावांचा कायापालट होणार आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना प्रभावीपणे राबवून राज्यातील खराब झालेले रस्ते चकचकीत केले. ग्रामपंचायतींना नवीन इमारत बांधकामासाठी व दुरुस्तीसाठी अनुदान उपलब्ध करून दिले. ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान घोषित केले. रस्ते, गटारे, अन्य मूलभूत सुविधांसाठी विशेष कार्यक्रम आखला.
ग्रामविकास विभागामार्फत स्वच्छ, सुंदर आणि हरितग्राम तयार करण्यासाठी नवीन उपक्रम राबविले. ग्रामीण जीवनोन्नती अभियानाद्वारे दारिद्र्य निर्मूलनासाठी योजना आखल्या. प्रशिक्षणातून विकास कार्यक्रमांतर्गत लोकप्रतिनिधींचे सक्षमीकरण केले. पंचायत राज व्यवस्था बळकट करण्यासाठी अनेक योजना आखल्या. इंदिरा आवास योजनेअंतर्गत राज्यातील बेघर लोकांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. सत्तेच्या माध्यमातून मुश्रीफ यांनी केलेले काम न भूतो न भविष्यतो असेच आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने परमेश्वर त्यांना उदंड आयुष्य देवो, हीच प्रार्थना.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..