वातावरण बातमी
‘उत्तर’चे रणांगण लोगो
14567
ईर्ष्या चुरस आणि वादावादी
...............
घोषणां प्रति घोषणांचा पाऊस ः एका-एका मतांसाठी शेवटपर्यंत धावाधाव
..................
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १२ ः मतदानाला सुरुवात होताच भाजपच्या बूथवरील भगव्या कापडावरून हे बूथ हटवण्याची सुरू झालेली मागणी, त्याला होत असलेल्या विरोधांमुळे निर्माण झालेला वाद आणि कार्यकर्त्यांच्या टोकाच्या ईर्षेतून शेवटच्या क्षणापर्यंत एका-एका मतांसाठी सुरू असलेली धावपळ, असे वातावरण आज कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानावेळी शहरभर पाहायला मिळाले.
दरम्यान, नेत्यांच्या मतदान केंद्रावरील भेटीगाठी, त्यांचे होणारे स्वागत आणि त्यातून होणाऱ्या घोषणांना प्रति घोषणांनी दिले जाणारे प्रत्युत्तर हेही शहराच्या काही भागात वादाचे कारण ठरले. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार मालोजीराजे यांना मारलेल्या ‘जादू की झप्पी’नेही वातावरण काहीसे हलके-फुलके झाले.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने मतदान झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर उभारलेल्या आधुनिक अशा बूथवर टाकलेल्या भगव्या कापडांमुळे सकाळपासूनच वादाला सुरुवात झाली. हे कापड काढावे अशी मागणी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केली, त्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने या वादाचे रूपांतर तणावात झाले. त्यातून काही ठिकाणी पोलिस व कार्यकर्ते तर काही केंद्रावर दोन्हीकडील कार्यकर्तेच एकमेकांना भिडले. यातून काही ठिकाणी हे कापड बदलून पांढरे कापड टाकले. त्यामुळे वातावरण बदलले, पण तणाव मात्र शेवटपर्यंत कायम होता.
या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्हीकडील कार्यकर्त्यांत टोकाची ईर्ष्या पाहायला मिळाली. सकाळपासूनच दोन्हीकडचे कार्यकर्त्यांची मतदान केंद्राबाहेर गर्दी झाली होती. केंद्राबाहेर टाकलेल्या बूथवर मतदानासाठी येणाऱ्या लोकांना मतदान केंद्राची व मतदानाची माहिती कार्यकर्त्यांकडून दिली जात होती. कसबा बावडा, शिवाजी पेठ परिसरात एकत्रित लोकांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. बावड्यात तर वाद्यांच्या गजरात उमेदवार व नेत्यांचा जयघोष करत मतदार केंद्रावर येताना दिसले.
कडाक्याच्या उन्हामुळे मतदान केंद्रावर सकाळपासूनच मोठ्या रांगा होता. शहराच्या सर्वच भागात हे चित्र होते. उन्हाचा तडाखा जसा वाढेल तशी केंद्रावरील गर्दी कमी झाली. कार्यकर्ते घराघरात जाऊन मतदारांना मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन करताना दिसत होते. तरीही दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत शहराच्या ताराबाई पार्क, नागाळा पार्क, रूईकर कॉलनी, राजारामपुरी भागात मतदान केंद्रे ओस पडली होती. सायंकाळी चारनंतर मात्र पुन्हा मतदान केंद्रावर लोकांच्या रांगा दिसू लागल्या. मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपणार होती, पण तत्पूर्वीच सदर बाजार, विचारे माळ, कदमवाडी, भोसलेवाडी आदी भागांत केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या. शेवटच्या क्षणापर्यंत एका-एका मतांसाठी दोन्हीकडील कार्यकर्त्यांची धावाधाव सुरू होती.
............
नेत्यांच्या भेटीने चैतन्य
पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रा. जयंत आसगांवकर, ऋतुराज पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार मालोजीराजे, त्यांच्या पत्नी मधुरिमाराजे यांच्यासह भाजप, सेनेच्या इतर जिल्ह्यातून आलेल्या आमदार, कार्यकर्त्यांनी केंद्रावर भेटी दिल्या. नेत्यांच्या या भेटीने कार्यकर्त्यांत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.
..............
जागेवरच जेवणाची सोय
मतदान केंद्राबाहेर व आत थांबलेल्या दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांसाठी उमेदवारांकडून जेवणाची सोय करण्यात आली होती. जागेवरच या कार्यकर्त्यांना ‘फूड पॅकेट’ देऊन रिचार्ज केले. प्रशासकीय यंत्रणेकडून पोलिस व मतदान कर्मचारी यांच्या जेवणाची सोय केली होती. केंद्रात येणाऱ्या मतदारांसाठी यंत्रणेने पिण्याच्या पाण्याची सोय केली होती. उन्हापासून बचावासाठी काही केंद्राबाहेर मंडप घालण्यात आला होता.
...........
फुलपाखरू आणि जय श्री राम
मतदारांना घरापासून केंद्रापर्यंत आणणे व सोडण्यासाठी रिक्षासह चारचाकी वाहनांची सोय करण्यात आली होती. यंत्रणेच्या तपासणीच्या कचाट्यातून सुटण्यासाठी महाविकास आघाडीच्या वाहनांवर ‘फुलपाखरू’ तर भाजपच्या वाहनांवर ‘जय श्री राम’ लिहिलेले फलक लक्ष वेधून घेत होते. सर्वच भागात ही वाहने फिरताना दिसत होती.
.........
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.