
शरद पवार भेटी
17275
‘अर्जिया शरदचंद्रजी’चे तैलचित्र
संशोधकांकडून शरद पवारांना भेट
-
विविध संघटना, कार्यकर्त्यांनी दिली निवेदने
कोल्हापूर, ता. २४ ः सह्याद्रीच्या पर्वतरांगांत शोधलेल्या नवीन वनस्पतीचे नामकरण ‘अर्जिया शरदचंद्रजी’ असे केले आहे. त्या वनस्पतीसोबतचे तैलचित्र आज न्यू कॉलेजचे संशोधक प्रा. विनोद शिंपले व वनस्पतीचे मेडिसीनल गुणधर्म शोधणारे शिवाजी विद्यापीठातील प्रा. प्रशांत अनभुले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांना भेट दिले. श्री. पवार यांना भेटण्यासाठी नागरिक, विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आज गर्दी केली. त्यांची निवेदने स्वीकारून खासदार सुप्रिया सुळे यांच्यासमवेत ते हेलिकॉप्टरने पुण्याला रवाना झाले.
शनिवारी तपोवन मैदानावर झालेल्या सभेनंतर ते हॉटेल पंचशीलवर थांबले होते. त्यांना भेटण्यासाठी आज सकाळी सात वाजता हॉटेलमध्ये कार्यकर्ते, नागरिकांनी गर्दी केली. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, शहराध्यक्ष आर. के. पोवार, अदिल फरास, राजेश लाटकर यांनी सभेबद्दल चर्चा केली. त्यानंतर पवार यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. वनस्पतीचे संशोधन करणाऱ्या प्राध्यापकांनीही भेट घेत नवीन शोधलेल्या वनस्पतीची तसेच तिला पवार यांचे नाव दिल्याची माहिती दिली. तसेच इतिहासकार सेतुमाधवराव पगडी यांचे शिवचरित्र एक अभ्यास हे पुस्तकही भेट दिले.
खासदार सुप्रिया सुळे, प्रवीण गायकवाड यांचीही सदिच्छा भेट घेतली. यावेळी न्यू कॉलेजचे प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील, अधिसभा सदस्य डॉ. एस. डी. डेळेकर, नीलेश पवार, देऊ भांगे, संजय मिस्किने आदी उपस्थित होते. श्री. पवार हॉटेलवरून न्यू पॅलेस पोलो मैदानावरील हेलिपॅडवर पोहोचले. तिथे श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, माजी आमदार मालोजीराजे, मधुरिमाराजे यांनी स्वागत केले.
दरम्यान, अंगणवाडी सेविकांबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस नगर परिषद कर्मचारी संघटनेने निवेदन दिले. सेविका, मदतनीस यांना शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी म्हणून मान्यता द्यावी, त्यांना चतुर्थ श्रेणीतील इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्यावे, निवृत्तीनंतर रोजगारासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा, यासह विविध मागण्या केल्या. याबाबत पाठपुरावा करू, असे आश्वासन श्री. पवार यांनी दिले. प्रदेशाध्यक्ष सुभाष मालपाणी, शारदा कडोलकर, ललिता जाधव, मानसी अंदरघीसके, योगेश चौगुले आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..