
कंरजीचा दर वधारला
17215
गडहिंग्लज : आठवडा बाजारात ग्राणीण भागातून कंरजीची आवक वाढली आहे. (अमर डोमणे : सकाळ छाचित्रसेवा))
कंरजीचा दर वधारला
पालेभाज्या, कोंथिबिरही तेजीत; कोबी, टोमॅटोची अधिक आवक
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २४ : येथील आठवडा बाजारात कंरजीची आवक वाढली असून दर क्विंटलमागे ७०० रुपयांनी वधारला आहे. भाजीमंडईत पालेभाज्या, कोथिंबिर यांची मागणीच्या तुलनेत कमी आवक असल्याने दर महागलेलेच आहेत. कोबी, टोमॅटोची वाढलेली आवक टिकून आहे. फळबाजारात घटलेल्या आवकेने दर चढेच आहेत. जनावरांच्या बाजारात तीव्र उष्म्यामुळे खरेदी विक्री थंडावली आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर आढळणारी कंरजी दरवर्षी हमखास उत्पन्न मिळवून देते. दरवर्षी एप्रिल महिन्यात याची आवक सुरू होते. मे अखेरीपर्यंत कंरजीचा हंगाम असतो. पूर्वी रंग, पेंड यासाठी वापरली जाणारी कंरजी आता औषधांसाठीही वापरली जाऊ लागली आहे. येथून सांगलीला कंरजी पाठवली जाते. आठवड्याला सुमारे १० टन कंरजीची आवक होते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत क्विंटलमागे ७०० रुपयांनी दर वधारल्याचे व्यापारी विजय मोरे यांनी सांगितले. क्विंटलला ३५०० ते ३७०० रुपये असा दर असल्याची माहिती रसुल नदाफ यांनी दिली.
भाजी मंडईत गेल्या दोन महिन्यापासून पालेभाज्या, कोथिंबिरचे दर वाढलेलेच आहेत. पेंढीचा दर १५ ते २० रुपयांवर पोहोचला आहे. कोबी, टोमॅटोची अधिक आवक कायम आहे. हिरवी मिरची, बिन्सचे दर तेजीत आहेत. ढब्बूचे दरही वाढले आहेत. फळबाजारात द्राक्षे, माल्टा, डाळिंब, चिक्कू, पेरूची आवक मंदावली आहे. सरासरी ८० ते १०० रुपये किलो दर आहे. आंब्याची अजूनही आवक जेमतेम असल्याने दर अधिकच आहेत. ७०० ते १००० रुपये डझन असा दर आहे. जनावरांच्या बाजारात सरासरी पन्नास टक्के आवक वाढत्या उन्हाळ्यामुळे घटली आहे. परिणामी, खऱेदी विक्री थंडावली आहे. म्हैशींची ५५ तर शेळ्यामेंढ्याची ७० आवक होती.
------------------
चौकट
उन्हाळी भुईमूग दाखल
बाजारात उन्हाळी भुईमूग दाखल झाला आहे. आवक जेमतेम आहे. ६० रुपये किलो असा दर आहे. ग्राहकाकडून भुईमुगाला मागणी आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..