
एकशे तीस कलाकारांचा कलाविष्कार
17353
-शाहू कृतज्ञता पर्व लोगो
--
विविध कलाविष्काराने शाहूंना मानवंदना
शाहू मिलमध्ये १३० चित्रकार-शिल्पकारांनी एकाचवेळी साकारल्या कला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ : राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त आयोजित लोकराजा शाहू कृतज्ञता पर्वाअंतर्गत आज सकाळी १० वाजता १३० हून अधिक चित्रकार, शिल्पकार यांनी त्यांच्या कलेच्या सादरीकरणातून शाहू महाराजांना मानवंदना दिली. शाहू मिल परिसरात मोठ्या हॉलमध्ये एकाच छताखाली हे सर्व कलाकार एकत्र आले. कधी काळी छत्रपती शाहू महाराज यांनी आबालाल रेहमान, दत्तोबा दळवी, बाबूराव पेंटर, भाई माधवराव बागल अशा अनेक दिग्गज चित्रकार, शिल्पकारांना महाराजांनी राजाश्रय दिला. या मातब्बर कलाकारांनी कलासाधना करून ‘कोल्हापूर स्कूल’ अशी एक स्वतंत्र शैली निर्माण केली.
या कलेचा जागर अखंडित ठेवण्याच्या उद्देशाने हे सर्व कलाकार शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी ऐतिहासिक शाहू मिलमध्ये एकत्र आले होते.
या उपक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, प्रवीण गायकवाड , शिरीष बिवलकर आदी उपस्थित होते. नागरिकांना ही प्रात्यक्षिके ४ दिवस पाहता येतील. या उपक्रमासाठी कॅमल कंपनीने सहकार्य केले असून, सर्व कलाकारांना कॅनव्हास व रंग कॅमलने मोफत उपलब्ध करून दिले आहे. दळवीज आर्ट इन्स्टिट्यूट, कला निकेतन कला महाविद्यालय, कलामंदिर कला महाविद्यालय, कोल्हापूर आर्ट फाउंडेशन, कोल्हापूर आर्टिस्ट गिल्ड, रंगबहार, कलासाधना यांच्यासह परिसरातील इतर चित्रकार, शिल्पकार आदींच्या उत्स्फूर्त सहभागातून हा उपक्रम झाला.
कलाविष्काराच्या उपक्रमानंतर नागरिकांसाठी या चित्रांचे प्रदर्शन, ‘कृतज्ञता पर्वात’ शाहू मिल परिसरात होणार आहे.
याप्रसंगी नंदकुमार गायकवाड, जयप्रकाश ताजणे, दिलीप घेवारी, सिद्धार्थ लांडगे, रंजित चौगुले, इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत आदी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..