
पान २
उचंगीच्या घळभरणीचे काम
आज प्रकल्पग्रस्त बंद पाडणार
चाफवडेत बैठक, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
आजरा, ता.२४ ः उचंगी प्रकल्पाच्या घळभरणीचे काम पूर्णत्वाला आले आहे. पण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची अजूनही सोडवणूक झाली नाही. तीन महिने सातत्याने शासन व प्रशासनाकडून आश्वासने दिली जात आहेत. लेखी पत्र देवून अंमलबजावणी केली जात नाही. त्यामुळे सोमवार (ता.२५) उचंगीच्या घळभरणीचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिला. याचे निवेदन आजरा- भुदरगडच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांना दिले आहे. त्याचबरोबर जलसंपदामंत्री जयंत पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनाही दिले आहे. चाफवडे (ता. आजरा) येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या बैठकीत प्रकल्पग्रस्तांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.
संजय तर्डेकर म्हणाले, तीन महिने धरणाचे काम गतीने सुरू आहे. पण त्या गतीने पुनर्वसनाच्या कामास गती नाही. शासन व प्रशासनाकडून लेखी पत्र व आश्वासने देवून फसवणूक केली जात आहे. धरणात पाणीसाठा सुरू झाला आहे. पडेल ती किंमत मोजण्यास प्रकल्पग्रस्त तयार असून पुनर्वसनाबाबत मंत्रीस्तरावरील बैठक होत नाही तोपर्यंत प्रकल्पग्रस्त धरणाचे काम बंद ठेवणार आहेत. निर्वाह क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न, पासस्ट टक्के रक्कम भरून न घेता दहा शेतकऱ्यांना जमिनी दिल्या नाहीत. वाटप केलेल्या जमिनीचा ताबा नाही यासह अन्य प्रश्न प्रलंबित आहेत. या वेळी चितळेचे सरपंच मारुती चव्हाण, पांडुरंग धनुकटेकर, कृष्णा गुडुळकर, दत्तात्रय बापट, निवृत्ती बापट, रघुनाथ धडाम आदी उपस्थित होते.
--
जमाबंदीमध्ये चौथ्यांदा वाढ
जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचा फेरआदेश लागू केला आहे. ही चौथ्यांदा वाढ केली आहे. धरणापासून दोन किलोमीटरच्या परिघात कामगार व पोलिस वगळता कोणालाही फिरण्यास मज्जाव केला आहे. हा आदेश ८ मे पर्यंत लागू आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..