
पर्यटन हंगाम
सुविधा-सवलतींमुळे पर्यटन तेजीत
एमटीडीसीच्या रिसॉटसह खासगी हॉटेलचे बुकिंगही जोरात
शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २४ ः यंदाचा उन्हाळी पर्यटन हंगाम तेजीत आला आहे. यात कोकण किनारपट्टीसह, गडकोट किल्ले, जंगल भ्रमंतीबरोबर शहरानजीकची पर्यटनस्थळे पाहण्यासाठीही पर्यटकांनी मोठी पसंती दिली आहे. अशा स्थितीत गोवा व कोकणकडे जाणारा पर्यटक कोल्हापुरातही एक मुक्काम करून पुढे जात आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनलाही गती मिळाली आहे. यासोबत पर्यटन महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने यंदाच्या हंगामात विविध सुविधा व सवलत योजना जाहीर केल्याने महामंडळाच्या रिसॉर्टचे जवळपास ९० टक्क्यांवर आरक्षण झाले आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटनात रोजच्या उलाढालीत जवळपास एक कोटींची भर पडत असल्याचा अंदाज आहे.
दोन वर्षांत कोरोनाचे संकट असल्याने अनेकांना पर्यटनाचा आनंद घेता येणे मुश्कील झाले. कोरोनाची तीव्रता कमी झाल्यावर निर्बंधही शिथिल झाले. त्यामुळे अनेकजण कुटुंबासह पर्यटनास बाहेर पडले. दोन महिन्यांत अनेकांनी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या रिसॉर्टसह खासगी रिसॉटचे बुकिंग जोरात केले.
कोट
पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ज्येष्ठ नागरिक, शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ बुकिंगमध्ये सवलत, आजी माजी सैनिक, अपंग व्यक्तींसाठी विशेष सवलत, ग्रुप बुकिंगसाठी २० खोल्यापेक्षा जास्त बुकिंग केल्यास सवलत, शालेय सहलीसाठी सवलत तसेच बहुतांशी रिसॉर्टमध्ये कॉम्प्लीमेंटरी नाश्ता अशा सुविधा दिल्या आहेत. खाद्यपदार्थांची माहिती, स्थानिक पदार्थांचा समावेश असलेले जेवण, अवतीभोवतीच्या निर्सग ठिकाणांची माहिती देणे, संस्कृतिक कार्यक्रम असेही उपक्रम आहेत.
- दीपक हारणे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी
चौकट
येथे आहे गर्दी
महाराष्ट्रात सध्या पन्हाळा, जोतिबा, राधानगरी, दाजीपूर, आजरा, आंबोली, नाशिकमध्ये नाशिक ग्रे पार्क, भंडारदरा, पुणे विभागात महाबळेश्वर, लोणावळा, माळशेज घाट, माथेरान, कोकणात तारकर्ली, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गणपतीपुळे येथे सर्वाधिक गर्दी आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाने तारकर्ली, नाशिक, लोणावळा येथे जलपर्यंटन केंद्राची सुविधा दिली आहे, असेही हारणे यांनी सांगितले.
चौकट
कुटुंबासह पर्यटनाचा आनंद
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची राज्यातील ४६० हून अधिक ठिकाणी (प्रत्येक जिल्ह्यात दोन ते आठ ठिकाणी) बेड ब्रेकफास्ट योजना आहे. येथे सहाशे ते दीड हजार रुपयांत खासगी निवासाची (घरगुती हॉटेल) सुविधा तसेच कमी शुल्कात जेवण सुविधा आहे. त्यामुळे कौटुंबिक पर्यटकांना कमी पैशातही चांगल्या पर्यटनाचा आनंद घेता येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..