
कोटितीर्थ तलाव जलपर्णीने व्यापला
17361
कोटीतीर्थ तलाव व्यापला जलपर्णीने
प्रदूषणामुळे दयनीय स्थिती; महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, कचराही साचला
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.२४ ः कोटीतीर्थ तलावात जलपर्णी वाढली असून, संपूर्ण तलाव हिरवागार झाला आहे. महापालिका प्रशासानाने दुर्लक्ष केल्याने या तलावाची दयनीय अवस्था झाली आहे. तलावाचा परिसरही अस्वच्छ असून, तलावात राजरोसपणे कचरा टाकला जातो. सोशल मीडियावरून कोटीतीर्थ तलावाचे फोटो व्हायरल झाले आहेत. पूर्वी शहराच्या बाहेर असणारा कोटीतीर्थ तलाव आता मध्यवस्तीत आला आहे. तलावाच्या भोवतीने वसती वाढली. काही वर्षांत तलावाची स्थिती बिकट आहे. या परिसरातील लोक तलावात कचरा टाकतात. या परिसरात रात्री मद्यपींचा ओपन बार भरतो. तलावातील पाण्याला हिरवा रंग आला आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. महिन्यात तलावातील मासे मरण्याची घटना घडली होती. आता तलावाच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. एकेकाळी नागरिकांचे आकर्षण असणारा कोटीतीर्थ तलाव आता हिरवागार दिसत आहे. सोशल मीडियावरून कोटीतीर्थाचे फोटो आज व्हायरल झाले. यावेळी सर्वांनी हे चित्र बदलले पाहिजे, असे सुचित केले आहे.
प्लास्टिकचा खच
कोटीतीर्थ तलावात पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, ग्लास, पिशव्या यांचा तरंगणारा खच पाहायला मिळतो. तसेच तलावाच्या परिसरातही प्लास्टिकचा कचरा पसरलेला आहे.
ंसंवर्धन आराखडा कधी?
कोटीतीर्थ तलावाचा संवर्धन आराखडा बनवला आहे. त्यासाठी महापालिकेने आर्थिक तरतूदही केली आहे, पण अजून याचे प्रत्यक्षात काम सुरू नाही. त्यामुळे कोटीतीर्थ तलावाचे रुपडे कधी पालटणार, असा प्रश्न आहे.
कोट
बंद असलेली शाहू मिल प्रशासनाने सुशोभित केली, पण त्याच वास्तूच्या भिंतीला लागून जिवंत झरे असणारा कोटीतीर्थ तलाव स्वच्छ करावा, असे प्रशासनाला वाटत नाही. कोटीतीर्थ तलावाच्या या अवस्थेला महापालिका, जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ जबाबदार आहे. या तलावाचे संवर्धन करण्याची गरज असून, प्रशासन मात्र उदासीन आहे.
- ॲड. बाबा इंदूलकर,अध्यक्ष, कॉमन मॅन संघटना.
कोटीतीर्थ तलावाचे संवर्धन आणि सुशोभिकरणासाठी निधी मंजूर असून आचारसंहितेमुळे निविदा प्रक्रिया करता आली नाही. लवकरच पुढील प्रक्रिया पूर्ण होऊन कोटीतीर्थ तलावाचे संवर्धन करण्याचे काम सुरू होईल. या अंतर्गत तलावातील गाळ काढणे, परिसराची स्वच्छता आणि सुशोभिकरण ही सर्व कामे करण्यात येणार आहेत.
- नितीन देसाई,अतिरिक्त आयुक्त, महापालिका.
Web Title: Todays Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..