
केंद्रशाळा मांडुकलीत चिमुकल्यांनी भरवला आठवडी बाजार
00886
केंद्रशाळा मांडुकलीत
चिमुकल्यांचा आठवडी बाजार
असळज : ‘भाजी घ्या, टॉमेटो घ्या, आले घ्या, कांदाभजी घ्या’ या आरोळ्यांनी केंद्रशाळा मांडुकली (ता. गगनबावडा) शाळेचे मैदान दणाणून गेले. निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या आठवडी बाजाराचे. बालवयातच व्यवहारिक ज्ञान मिळावे, फळभाज्या, रानभाज्या, पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी मांडुकली केंद्रशाळेच्या प्रांगणात आठवडा बाजार भरविला होता. लहान मुलांनी बाजारात भाज्या, फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. काही मुलांनी आणलेल्या मिसळ, वडापावसह विविध पदार्थांचा खवय्यांनी आनंद लुटला. बाजारात खरेदीचा आनंद ग्रामस्थ, पालकांनी घेतला. आठवडी बाजारप्रसंगी मांडुकलीच्या उपसरपंच स्वाती पडवळ, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पंडित सावंत, उपाध्यक्षा माधुरी पडवळ, मांडुकलीच्या पोलिसपाटील सविता पडवळ, मुख्याध्यापिका राधिका पाटील, अध्यापिका समिधा पोवार, शाळा व्यवस्थापनचे सदस्य, पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.