चौधरवाडी-गवशी दरम्यानचा नवीन पूल बनला धोकादायक

चौधरवाडी-गवशी दरम्यानचा नवीन पूल बनला धोकादायक

Published on

चौधरवाडी-गवशीचा
नवा पूल धोकादायक

चिखलाचे साम्राज्य; एसटी वाहतूक बंद पडण्याची भीती

पंडित सावंत : सकाळ वृत्तसेवा

साळवण, ता. ६ : धामणी खोऱ्यातील गवशी ते चौधरवाडी गावांदरम्यान असलेल्या ओढ्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून लाखो रुपये खर्चून नवीन पूल बांधला आहे. मात्र माती भरावाचे काम ऐन जूनमध्ये पावसाच्या तोंडावर केल्याने पावसामुळे पुलावरील रस्ता चिखलमय झाला आहे. चिखलमय रस्ता अपघातास निमंत्रण देणारा ठरत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे. धामणी खोऱ्यातील एसटी वाहतूक बंद पडण्याची भीती व्यक्त होत आहे.

परखंदळे-धुंदवडे ते गगनबावडा हा धामणी खोऱ्याचा प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरील चौधरवाडी (ता. गगनबावडा) ते गवशी (ता. राधानगरी) दरम्यानच्या ओढ्यावर नवीन पूल बांधला आहे. संबंधित ठेकेदाराने ऐन उन्हाळ्यात एप्रिलमध्ये काम सुरू करुन ते कासवगतीने सुरू ठेवले होते. पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करुन रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे गरजेचे होते. ऐन पावसाळ्यात जूनमध्येच संबंधित ठेकेदाराने पुलाच्या भरावाच्या काम हाती घेतले. हे काम घाईगडबडीत केले आहे. भरावाच्या मातीकामावर खडीकरण न केल्याने पावसामुळे पुलाच्या दोन्ही बाजूंना रस्ता चिखलमय झाला आहे. आठ-दहा दिवसांपासून वाहनधारकांना पुलावरून धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
आठ दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसामुळे पुलावरील माती भरावा भिजल्याने दलदल होऊन रस्ता निसरडा बनला आहे. धोकादायक रस्त्यावर दुचाकी घसरून लहान-मोठे अपघात घडत आहेत. कोणत्याही क्षणी कोल्हापूर-गगनबावडा दरम्यान सुरू असलेली एस.टी. वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील चिखल हटवून खडी टाकून रस्ता वाहतूकयोग्य करावा, अशी मागणी होत आहे.

चौधरवाडी : गवशी-चौधरवाडीदरम्यान नव्या पुलावर चिखलाने वाहतूक धोकादायक बनली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.