मुदाळ तिट्ट्यावर रस्त्याकडेलाच भाजी वक्री

मुदाळ तिट्ट्यावर रस्त्याकडेलाच भाजी वक्री
Published on

3146
मुदाळ तिट्टा ः येथे स्वतंत्र अशी भाजी मंडई नसल्याने विक्रेत्यांना रस्त्याकडेला बसूनच भाजी विक्री करावी लागते.
................
मुदाळ तिट्ट्यावर रस्त्याकडेलाच भाजी वक्री

वाहतुकीला अडथळा ः स्वतंत्र भाजी मंडई होण्याची गरज

सकाळ वृत्तसेवा
बिद्री, ता. १ : मुदाळ तिट्ट्याला कागल, राधानगरी, भुदरगड या तीन तालुक्यांचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाते. येथे स्वतंत्र भाजी मंडई नसल्याने परिसरातील गावांमधून येणारे शेतकरी व भाजी विक्रेते मुख्य रस्त्याकडेलाच जागा मिळेल तेथे बसून उन्हा-पावसात भाजी विक्री करतात. शिवाय ग्राहक स्त्यावर वाहन थांबवून भाजी खरेदी करतात. परिणामी वाहतुकीला अडथळा होऊन अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथे स्वतंत्र भाजी मंडईची सोय करावी, अशी मागणी भाजी विक्रेते व नागरिकांतून होत आहे.
मुदाळ तिट्ट्यापासून दीड किलोमीटरवर आदमापूर (ता. भुदरगड) येथे सद्‍गुरू बाळूमामा देवस्थान असल्याने तेथे भाविकांची नेहमीच वर्दळ असते. आदमापूर व मुदाळ तिट्टा येथे मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय चालतो. त्यामुळे येथे दररोज भाजीपाला खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात चालते. परिसरातील अनेक गावांतून शेतकरी येथे भाजी विक्रीसाठी येतात, तर कर्नाटकातील संकेश्वर, गोकाक व इतर गावांमधूनही भाजीविक्रेते भाजी घेऊन येतात. भाजी विक्रीतून येथे दररोज मोठ्या प्रमाणात उलाढाल होते.
येथे शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी मंडई नसल्याने ते रस्त्याकडेला जागा मिळेल तेथे बसतात. त्यामुळे ग्राहकांची गर्दी होऊन वाहतुकीला अडथळा होतो. यामधून काही वेळा वादावादीचे प्रसंग घडतात. परिसरात हॉटेल, घरगुती खानावळी, खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. त्याचबरोबर पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरांना जाण्यासाठी या ठिकाणी खासगी बसचा थांबा असल्यामुळे या ठिकाणी भाजीपाल्यासह दूध व दुग्धजन्य पदार्थाची विक्री मोठ्या प्रमाणात होते. तत्काळ आणि मुबलक ताजी भाजी मिळत असल्यामुळे व्यावसायिक व ग्राहक भाजी खरेदी करण्यासाठी येथे गर्दी करतात. संबंधित विभागाने लक्ष देऊन या ठिकाणी सुसज्ज अशी भाजी मंडई बांधण्याची गरज आहे.
मुदाळ तिट्टा परिसरातील अनेक शेतकरी एसटीने, खासगी वाहनातून भाजी विक्रीसाठी येतात. शेतकरी व महिलांना पिण्याच्या पाण्याची व शौचालयाची सुविधा नसल्यामुळे त्यांची मोठी कुचंबणा होते. या ठिकाणी सुसज्ज अशा भाजी मंडईबरोबरच सुलभ शौचालय बांधणे गरजेचे आहे.
......
कोट...
घराजवळच ताजी भाजी उपलब्ध होत असल्यामुळे महिलांना इतरत्र जाण्याची गरज भासत नाही. परंतु भाजी मंडई नसल्यामुळे मर्यादित वेळेतच विक्रेते व शेतकरी भाजी विक्रीसाठी येतात. त्यामुळे संबंधित विभागाने मोकळ्या जागेवर भाजी मंडई बांधून शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून द्यावी.
- दीपाली पाटील, गृहिणी
....
कोट...
आसपासच्या गावांतून येणाऱ्या शेतकऱ्यांकडून दररोज ताजा भाजपाला मिळत असल्याने हॉटेल व्यावसायिक व घरगुती खानावळींमधून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळते. मात्र, शेतीमाल ठेवण्यासाठी व विक्रीसाठी मंडई नसल्याने शेतकऱ्यांना रस्त्यावर बसूनच भाजीपाला विकावा लागतो.
- संजय बलुगडे, हॉटेल व्यावसायिक, मुदाळ तिट्टा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com